टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

HSRP नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर १५ फेब्रुवारीपासून कारवाई

On: February 12, 2026 10:25 AM
Follow Us:

Pune News: आतापर्यंत केवळ १० लाख ७० हजार वाहनधारकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनांवरच प्रत्यक्ष प्लेट बसविण्यात आली आहे.

पुणे : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) (HSRP) बसविण्यासाठी परिवहन विभागाने आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली असतानाही वाहनधारकांचा प्रतिसाद समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून ‘एचएसआरपी’ (HSRP) नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन विभागाने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने जानेवारी २०२५ पासून प्रत्यक्ष नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुणे शहर व जिल्ह्यात सुमारे २५ लाखांहून अधिक वाहनांना ही प्लेट आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत केवळ १० लाख ७० हजार वाहनधारकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनांवरच प्रत्यक्ष प्लेट बसविण्यात आली आहे.(HSRP)

याचा अर्थ, सुमारे १५ लाख वाहनधारकांनी अद्याप नियमांचे पालन केलेले नाही. परिवहन विभागाने यासाठी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर २०२५ अशी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ दिली होती. ३१ डिसेंबरनंतरही कारवाई न करता अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.

मात्र वारंवार सूचना, जनजागृती आणि मुदतवाढीनंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता कडक भूमिका घेण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीनंतर ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर दंड आकारला जाणार असून, कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

एचएसआरपी बसवून घ्या, अन्यथा दंड भरा

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदतीपूर्वी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना मर्यादित सवलत देण्यात आली आहे. मात्र, मुदतीनंतर नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तपासणीदरम्यान वाहनांची एचएसआरपी, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) आणि वाहनचालक परवाना यांचीही पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, काही फिटमेंट केंद्रांवर अपॉइंटमेंट असूनही वाहनधारक वेळेवर न पोहोचल्याने प्रक्रियेत अडथळे येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता एचएसआरपी बसवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

अशी आहे एचएसआरपी आकडेवारी

-एचएसआरपीसाठी नोंदणी केलेली वाहनसंख्या : १० लाख ७० हजार
-प्रत्यक्ष एचएसआरपी बसवलेली वाहने : ८ लाख ६२ हजार
-एचएसआरपीसाठी नोंदणी न केलेली वाहनसंख्या : १५ लाख ३० हजार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now