Iran US War Ceasefire: अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष (Iran US War) अखेर थांबलाअसून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी (Iran US War Ceasefire) झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज भारतीय वेळेनुसार आज सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र दिलेल्या अल्टिमेटम पूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत अल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. (Iran US War Ceasefire)
इराणचा दोन आठवडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती ही या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शवली आहे. इराणवर मोठा हल्ला करण्याची आणि तेथील संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले. या युद्धविरामात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचे आभार मानले. (Iran US War Ceasefire)
डोनाल्ड ट्रम्प काय काय म्हणाले? (Iran US War Ceasefire)
ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे, परंतु अट अशी आहे की इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी. हे करण्यामागचे कारण असे आहे की, आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत, आणि आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत. मला इराणकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे, आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे. अमेरिका आणि इराण जवळपास सर्व पूर्वीच्या विवादांवर सहमत झाले आहेत, परंतु कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य-पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना, या दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे हा माझा सन्मान आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी काय म्हणाले? (Mojtaba Khamenei On Donald Trump)
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामनेई यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याचं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनी यांनी दिलेल्या माहितीनूसार, अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. मोजतबा यांनीच सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती. (Iran US War Ceasefire)
अमेरिका आणि इराणचं युद्ध कोणत्या 10 अटींवर युद्ध थांबलं? (Iran US War Ceasefire)
1. अहिंसेप्रती कटिबद्धता
2. होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार
3. युरेनियम संवर्धनास परवानगी
4. सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
5. सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
6. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
7. गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
8. इराणला नुकसानभरपाई देणं
9. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
10. लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम











