Pilot change before Ajit Pawar flight : बुधवारी सकाळी बारामतीच्या रनवेजवळच अजित पवार यांचं विमान खाली कोसळून मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक, विमानाचे पायलट, को पायलट आणि फ्लाईट अटेंडंट अशा 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामतीजवळच्या काही सभांसाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास मुंबईहून विमानाने निघाले होते. मात्र बारामती विमातळाच्या जवळ आल्यानंतर त्याचं प्लेन अचानक खाली कोसळून मोठ्ठा स्फोट झाला आणि आग लागली. त्यानंतर आणखीही काही स्फोट झाले. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. तसेच विमानात त्यांच्यासोबत असलेले अंगरक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. अजित पवारांच्या आक्मिक निधनाने अख्खा महाराष्ट्र हादरला.
काल (गुरूवार) दुपारी 12 च्या सुमारास अजित पवार यांच्या पार्थिवावार बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पवार कुटुंब,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील सर्व पक्षाचे नेते, राजकारणी, काही सेलिब्रिटी, बारामतीकर जनता आणि राज्यभरातून आलेले दादांचे चाहते, सर्वसामान्य नागरिक असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दादांच्या जाण्याने प्रत्येक जण हळहळला, अनेकांच्या डोळ्यात अश्रूंना खळ नव्हता.

ऐनवेळी बदलला अजित दादांच्या विमानाचा पायलट ?
या विमान अपघाताची चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्स सापडला असून त्याच्या तपासणीतून विमान अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकतं. दरम्यान या प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे. ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्राने एक धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चा सुरू झाल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या विमानामध्ये अजित पवार होते, ते विमान दुसराच पायलट चालवणार होता. या कंपनीने बारामतीच्या उड्डाणासाठी दुसऱ्या वैमानिकाची निवड केली होती. मात्र बुधवारी तो वैमानिक हा वाहतूक कोंडीत अडकला होता, आणि त्याला फ्लाईटसाठी पोहोचण्यास उशीर होत होता. मात्र अजित पवार यांना बारामतीला पोहोचण्यास उशीर झाला असता म्हणून, विमान कंपनीने ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर सोपवली. त्यानंतर त्यांच्यासह को-पायलट शांभवी पाठक यांनी या विमानातून उड्डाणही केलं.
संबंधित बातम्या
मिळालेल्या माहितीनुसार, कॅ. सुमित कपूर हे साधेसुधे वैमानिक नव्हते, ते अत्यंत अनुभवा होते, त्यांना सुमारे 15 हजारांहून अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव होता. त्यांच्या मित्राच्या सांगण्यानुार, ते खूप अनुभवी होते, त्यांच्याकडून काही चूक होण्याची शक्यता कमी होती. काही दिवसांपूर्वीच सुमित हे हाँगकाँग येथून परत आले होते. हे विमान बारामतीला नेण्याआधी अवघे काही तास आधी त्यांना विमान उड्डाणाची माहिती मिळाली होती, अशी माहिती कॅप्टन सुमितचे मित्र जी. एस. ग्रोवर यांनी दिल्याचे समजते.
अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू आहे. सीआयडी चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या तपासाला चौकशी सुरूवात केली आहे. प्राथमिक चौकशी होईल, या अपघाताचा तपशील नीट तपासला जाईल. अपघात नेमका का, कसा झाला, त्याची नेमकी कारणं काय या सर्व अनुषंगाने चौकशी केली जाईल.




