जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुतारीचा गळा आवळून घड्याळाच्या चिन्हांवर लढण्याची तयारी शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar and Sharad Pawar NCP: नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली. या दोन्ही पक्षांची अक्षरश: वाताहात झाली असून बालेकिल्ले सुद्धा ढासळले आहेत. अशा स्थितीत आता दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची चर्चा रंगली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा शिगेला पोहोचली असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुतारीचा गळा आवळून घड्याळाच्या चिन्हांवर लढण्याची तयारी शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घड्याळ चिन्हावर लढण्याची मागणी
महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या दयनीय अवस्थेनंतर दोन्ही पक्षांमधील मत विभाजन टाळण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. काल (17 जानेवारी) झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जेष्ठ नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी त्यांना अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती आहे. मत विभाजन टाळून एकत्र लढल्यास फायदा होईल अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेतली जात आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 16 जानेवारी पासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी
दुसरीकडे, काल महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर कॅबिनेट बैठक झाली. मात्र, या कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली होती. या संदर्भात भाजपविरोधात नाराजी असल्याची सुद्धा माहिती होती. राज्यामध्ये भाजपला भरघोस यश मिळालं असलं तरी दोन्ही पक्षांची मात्र चांगलीच वाताहात झाली आहे. एकनाथ शिंदे यांना फक्त कसाबसा ठाणे हा आपला बालेकिल्ला टिकवता आला. मात्र, अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दाणादाण उडाली. प्रचारात थेट भाजपला अंगावर घेऊन सुद्धा अजित पवार यांची अवस्था दयनीय झाली. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या हाती भोपळा लागला आहे. त्यामुळे आता ही फाटाफूट टाळण्यासाठीच झेडपी आणि पंचायत समितीमध्ये किमान एकत्रित लढून चांगले यश मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून पावलं उचलली जात असल्याची चर्चा आहे.



