*स्थान* : ता.अकोला, जि.अहमदनगर
*पायथ्याचे गाव* : बारी
*उंची* : १६४६ मीटर (५४०० फूट)
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. हे शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहेत. या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर (५४०० फूट) आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केली आहे. कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या बसविल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे.
*पाहण्याची ठिकाणे* : कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारऱ्याचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.
*पोहोचण्याच्या वाटा* : नाशिक इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी-महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरा मार्गे बारी गावास जाता येते. भंडारदऱ्यापासून ‘बारी’ हे गाव ६ किमी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरी वरून भंडारदऱ्याला जाणाऱ्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी लोखंडी शिड्या बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोड्याच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते. स्वतःचे वाहन असल्यास मुंबई-कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी-सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे. या फाट्यावरून भंडारदऱ्याला जातांना, भंडारदऱ्याच्या अलिकडे ६ किमी अंतरावर बारी हे गाव आहे.
संबंधित बातम्या





*सोय* : येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेड मध्ये किंवा भंडारदऱ्याला किंवा बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते. बारी गावात आणि भंडारदऱ्याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरी लगत चहा आणि भजी उपलब्ध आहे. शिखरावर चढताना कमीत कमी सामान न्यावे. रस्त्यात जागोजागी नाश्ता, चहा, पाणी, जेवण देखील मिळते. शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या आधी एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे.
*संदर्भ : विकिपीडिया*