Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली.
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये काल (30 जून) शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आले. यामध्ये शिवसेनेचा राज्याच्या बाहेरही विस्तार केला जाणार आहे. शिवसेनेला राष्ट्रीय दर्जा मिळावा या अनुशंगाने पक्षातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्याबाहेर 23 राज्यांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि संघटना ही कार्यरत आहेत. यातील राजस्थानमध्ये 3 आमदार हे शिवसेनेचे आहेत. याशिवाय नागालंड, त्रिपुरा, पंजाब, मनिपूर येथील काही आमदार व छोटे पक्ष शिवसेनेसोबत येऊ इच्छित आहेत. त्यामुळेच महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपसोबत राज्याबाहेरही शिवसेना सोबत येऊ पाहणार्या छोट्या पक्षांनासोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पक्षातील नेते विचार करत आहेत.
पुढील राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक दिल्लीला-
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पुढील राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक दिल्लीला घेण्याबाबतचे वक्तव्य करत, पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं सिमोल्लघंन होणार असल्याचे संकेत दिले. यापुढे शिवसेना पक्ष स्वर्गीय हिंदुह्रदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाकडच्या 1999 सालाच्या पक्षीय घटनेला प्रमाण माणून पुढील वाटचाल करणार असल्याचे एकमतही शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीत बैठकीत ठरले.
ठाकरे गटाला चोख प्रत्युत्तर द्या; एकनाथ शिंदे यांच्या सूचना
हिंदींच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत चर्चा केली. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाला चोख प्रत्युत्तर द्या अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात. तसचं हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोहोचवा असे आदेशही शिंदेंनी दिलेत.
हिंदीच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेविरोधात कुरघोडीचं राजकारण?
पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आणि राज्य सरकारनं अखेर जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र हिंदीआडून आपल्यालाच अडचणीत आणण्यात आल्याची भावना शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येतेय. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीचा मुद्द्यावर चर्चा झाली. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणल्याचं मत शिशिर शिंदेंनी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.