Wtc Final 2025 South Africa vs Australia Day 2 Highlights : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 महाअंतिम सामना रंगतदार स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाने 200 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप 2025 अंतिम सामन्यात आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या महाअंतिम सामन्यातील पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने 5 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने दक्षिण आफ्रिकेच्या 6 फलंदाजांना ढेर केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 212 धावांच्या प्रत्युत्तरात 138 पर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने या 74 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट्स गमावून 144 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 218 धावांची आघाडी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या दिवशी झटपट 2 झटके ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचं 138 धावांवर पॅकअप
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी 4 बाद 43 धावसंख्येपासून खेळाला सुरुवात केली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडींगहम या दोघांनी दक्षिण आफ्रिकेला पुढे नेलं. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 64 रन्सची पार्टनरशीप केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या डावाला स्थिरता मिळाली. मात्र पॅट कमिन्सने ही जोडी फोडली. पॅटने टेम्बा बावुमा याला आऊट केलं. टेम्बाने 84 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 36 रन्स केल्या. त्यानंतर पॅट कमिन्सने धारदार बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेचं अशाप्रकारे 138 धावांवर पॅकअप झालं. दक्षिण आफ्रिकेसाठी बेडींगहम याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. बेडींगहमने 111 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया 74 धावांनी आघाडी घेण्यात यशस्वी ठरली.
पॅट कमिन्सचं त्रिशतक
ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्स याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. पॅटने 18.1 ओव्हरमध्ये 27 धावांच्या मोबदल्यात 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पॅटने यासह 300 विकेट्स पूर्ण केल्या. पॅट अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा आठवा गोलंदाज ठरला.
ऑस्ट्रेलिया 218 धावांनी आघाडीवर
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात संयमी सुरुवात केली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर कांगारुंची घसरगुंडी झाली. ऑस्ट्रेलियाने 28 धावांवर पहिले 2 विकेट्स गमावल्या. उस्मान ख्वाजा याने 6 धावा केल्या. तर कॅमरुन ग्रीन याला भोपळाही फोडता आला नाही. रबाडाने एकाच ओव्हरमध्ये या दोघांना आऊट केलं. विशेष म्हणजे रबाडाने या दोघांना पहिल्या डावातही एकाच ओव्हरमध्ये आऊट केलं होतं.
झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या जोडीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर दोघेही फ्लॉप ठरले. स्टीव्हन स्मिथ 13 तर ट्रेव्हिस हेड 9 रन्स करुन आऊट झाले. ब्यू वेबस्टर याने 9 धावांचं योगदान दिलं. ओपनर मार्नस लबुशेन याने 22 धावा केल्या. तर पॅट कमिन्सने 6 रन्स केल्या. तर इतरांनी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. पॅट आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 7 आऊट 73 अशी स्थिती झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज ऑस्ट्रेलिया 100 धावांच्या आत रोखतील, असं चित्र होतं. मात्र तसं झालं नाही.
एलेक्स कॅरी याने 43 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 200 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली. कॅरीने 50 बॉलमध्ये 5 फोरसह 43 रन्स केल्या. कॅरी आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 8 आऊट 134 अशी स्थिती झाली. त्यानंतर मिचेल स्टार्क 16 आणि नॅथन लायन 1 धावेवर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 40 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 144 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे 218 धावांची आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या आहेत. तर मार्को यान्सेन आणि वियान मुल्डर या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली आहे.