एकाच रात्री दोन घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
सांगोला -चोरट्यांनी घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी करून लोखंडी कपाटासह पेटीतून ६ तोळे सोन्याच्या दागिन्यासह चांदीचे पैंजण , नाकातील सोन्याची नथ व रोख ७५ हजार रुपये असा एकूण सुमारे २ लाख ३० हजार रुपयेचा ऐवज चोरून लंपास केला. ही घटना काल रविवारी पहाटे ३ च्या सुमारास शिवणे ता. सांगोला येथे घडली . गणेश दिलीप बनसोडे रा. शिवणे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे दरम्यान सांगोला तालुक्यात ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
फिर्यादी ,गणेश बनसोडे हे टेलरिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी त्यांची आई परगावी गेल्याने शेजारील घराच्या दरवाजाला कुलूप लावून समोरच्या घरात ते आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते चोरट्यांनी फिर्यादी झोपलेल्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली आणि समोरील घराच्या दरवाज्याचे कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटातील ६० हजार रूपयेच्या दोन सोन्याच्या चैन ,७५ हजार रुपये अडीच तोळ्याच्या सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या, १० हजार रूपयेची कानातील फुले व जुबे ,३ हजार रुपये चांदीचे पैंजण व हातातील चांदीचे कडे ,६ हजार रुपयेची लहान मुलाची सोन्याची अंगठी व बाळीसह रोख ७५ हजार तसेच १ हजार रुपयाचे मनगटी घड्याळ असा सुमारे २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला व तेथून चोरट्यांनी मराठी शाळेच्या पाठीमागे राहत असलेले मच्छिंद्र वैभव बंडगर यांचेही बंद घर फोडून कपाटातील चांदीचे पैंजण नाकातील सोन्याची नथ व रोख रक्कम चोरून लंपास केली दरम्यान फिर्यादी रविवारी पहाटे ३ च्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता त्यांना झोपलेल्या घराला बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले म्हणून त्यांनी शेजारी राहणारे विजय बनसोडे यांना फोन करून सांगितले त्यानंतर ते घरातून बाहेर आले असता समोरील घराचा दरवाजा उघडा दिसल्याने घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.