Rohit Pawar Ujani Dam: सकाळी साडेदहा वाजता या रास्ता रोकोला सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता.
सोलापूर : सगळ्या जगाने टाकून दिलेले प्रकल्प आमच्यावर लादलेले आम्ही खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत उजनी धरणावर (Ujani dam) डेटा सेंटर ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर हे प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला. शासनाने तातडीने येथील बाधित जनतेची लोक सुनावणी दोन महिन्यात घ्यावी आणि लोकांच्या मागणीनुसार हा प्रकल्प तातडीने रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत रोहित पवारांनी विविध मुद्द्यांना घेऊन उपोषण, आंदोलन केले आहेत. आता, उजनी धरणावर होत असलेल्या प्रकल्पावरुन त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
उजनी धरणावर होमाऱ्या AI डेटा सेंटर प्रकल्पाच्या विरोधात खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार संजय शिंदे, रासप अध्यक्ष महादेव जानकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील आणि नुकतेच पदवीधरमधून निवडून आलेले आमदार प्रतापसिंह पाटील उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता या रास्ता रोकोला सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यावेळी बोलताना, रोहित पवार म्हणाले की, आम्हाला सेमी कंडक्टरसारखे प्रकल्प दिल्यास आम्ही त्याचे स्वागत करू, मात्र पाणी खाणारा आणि वीज खाणारा हा धोकादायक प्रकल्प आम्ही कधीही स्वीकारणार नाही. जे प्रकल्प जगानेच नाही तर अगदी गुजरातने सुद्धा स्वीकारले नाहीत ते आमच्यावर लादलेले खपवून घेणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या एका प्रकटनात ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर हे दोन प्रकल्प रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या एम.ओ.युमध्ये हे प्रकल्प असताना खोटी माहिती दिली जात असल्याचे सांगत रोहित पवारांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, अशा पद्धतीची खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान, रोहित पवार यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना हॉटेलमध्ये बसून काम करणारा पालकमंत्री आणि दमबाजी करणारा पालकमंत्री काय कामाचा असा सवाल केला.
धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प स्वीकारला जाणार नसून जर आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, जोपर्यंत हा प्रकल्प रद्द झाल्याचे जाहीर केले जात नाही तोपर्यंत याठिकाणी कुठलेही भूमिपूजन वगैरे करू देणार नाही, असा इशारा दिला. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही प्रकल्पाला विरोध दर्शवला. तसेच, आता हुकूमशाहीचे सरकार पाडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी आल्यानंतर तब्बल चार तास सुरू असलेले हे आंदोलन आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.










