Solapur DCC Bank Election Unopposed Seats: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी 238 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, विविध कार्यकारी सोसायटी गटातील 11 पैकी 3 जागांवर भाजपचा विजय निश्चित झाला आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) आपले खाते उघडले आहे. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील एकूण 11 जागांपैकी बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या 3 महत्त्वाच्या तालुक्यांतील जागा बिनविरोध झाल्या आहेत. या तिन्ही मतदारसंघांमध्ये केवळ एकाच कुटुंबातील सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल असल्याने अर्ज मागे घेण्याच्या दिवशी औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
Solapur DCC Bank Unopposed Candidates : ‘या’ तीन नेत्यांची बिनविरोध निवड निश्चित
बँकेच्या सोसायटी गटातून बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये खालील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे
बार्शी तालुका: भाजप आमदार राजेंद्र राऊत (पुत्र रणवीर राऊत यांचा अर्ज मागे घेतला जाणार).
मोहोळ तालुका: भाजप नेते विक्रांत उर्फ बाळराजे पाटील (वडील माजी आमदार राजन पाटील यांचा अर्ज मागे घेतला जाणार).
मंगळवेढा तालुका: सिद्धेश्वर अवताडे (बबनराव अवताडे यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अर्ज मागे घेतले जाणार).

बार्शी गटातून आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांचे पुत्र रणवीर राऊत यांचेच केवळ दोन अर्ज दाखल होते. त्यामुळे रणवीर राऊत यांचा अर्ज मागे घेऊन आमदार राऊत यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. तसेच मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र बाळराजे पाटील या दोघांचेच अर्ज असल्याने वडिलांनी माघार घेतल्यास बाळराजे पाटील यांचा विजय निश्चित आहे.
19 Seats 238 Applications : 19 जागांसाठी 238 जणांचे अर्ज दाखल
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांसाठी तब्बल 238 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उर्वरित 16 जागांवर तीव्र चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Dhairyasheel Mohite Patil Statement : बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू
दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीदेखील बँकेच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार नेत्यांशी चर्चा सुरू असून लवकरच बिनविरोध निवडणुकीचा निर्णय होईल, असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता ही निवडणूक सर्वपक्षीय संमतीने बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे या संदर्भात अंतिम निर्णय घेतील,” अशी प्रतिक्रिया आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.











