सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनांक 1 ऑगस्ट 2026 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम तसेच लेझर लाईटच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार यांनी सोलापूर शहर हद्दीमध्ये अशा साधनांच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये हा आदेश लागू करण्यात आला असून, दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी 00.01 वाजलेपासून ते 9 ऑगस्ट 2026 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांकडून आयोजित कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट शो/वापरास बंदी राहणार आहे.

मोठ्या आवाजातील डॉल्बी सिस्टीममुळे काही नागरिकांना कान व छातीचे गंभीर त्रास होण्याची शक्यता असून, लेझर लाईटमुळे विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते. याबाबत विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून प्रशासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती.
सार्वजनिक सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, दिनांक 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत सोलापूर शहर हद्दीमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळाकडून आयोजित कार्यक्रम मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम लेझर लाईट शो चा वापर करणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार प्रतिबंध करण्यात येत आहे.
या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.











