Maharashtra Weather Update: भारत हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत हवामान विभागाने (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 साठी (Monsoon 2026) दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज (Long Range Forecast) जाहीर केला आहे. या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासाठी यंदाच्या मान्सून हंगामात अत्यंत चिंताजनक चित्र समोर आले आहे. राज्यात यंदा पाऊस सामान्यपेक्षा कमी पडण्याची आणि उष्णतेच्या लाटा तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर 2026) दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानले जाते. महाराष्ट्र हा प्रामुख्याने मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्प या दोन्ही विभागांत मोडतो. या दोन्ही विभागांत यंदा सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य भारतात 43 टक्के तर दक्षिण द्वीपकल्पात 45 टक्के संभाव्यता कमी पावसाची आहे.
Maharashtra Weather Update: कोअर झोनमधील कोरडवाहू शेती धोक्यात?
महाराष्ट्रातील विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) आणि पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) बहुतांश भाग हे मान्सून कोअर झोन (MCZ) मध्ये येतात. हाच झोन देशातील आणि राज्यातील बहुतांश कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे. IMD च्या अंदाजानुसार, या कोअर झोनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची 43 टक्के शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षातील खरीप हंगामावर (Kharif Season) याचा विपरित परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. जून 2026 या पहिल्या महिन्यातही देशभरात सरासरीच्या 92 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असल्याने, महाराष्ट्रात जून उजाडला तरी पावसाची ओढ कायम राहू शकते.
Maharashtra Weather Update: जून महिन्यात रात्रीही उकाडा; उष्णतेच्या लाटांचा इशारा
पावसाची तूट असतानाच, IMD ने जून 2026 मध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांत सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटांचा (Heatwaves) इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि काही अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान (Maximum Temperature) सामान्यपेक्षा अधिक राहील. धक्कादायक बाब म्हणजे, किमान तापमानही (Minimum Temperature) सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

El Nino Effect: ‘एल निनो’चे संकट गडद
सध्या प्रशांत महासागरावर न्यूट्रल परिस्थिती असली तरी, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात ‘एल निनो’ (El Nino) परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, ज्या ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो, त्या वर्षात भारतात, विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तूट अधिक जाणवते.
Maharashtra Weather Update: शेती, पाणी आणि वीजनिर्मितीवर होणार परिणाम
सामान्यपेक्षा कमी पाऊस पडल्यास त्याचे थेट दुष्परिणाम शेती (Agriculture), पाणीपुरवठा (Water Supply), जलविद्युत निर्मिती (Hydroelectric Power Generation) आणि एकूणच पर्यावरणावर (Environment) होऊ शकतात, असे IMD ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाईची तीव्र समस्या असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी हा अंदाज अधिकच चिंताजनक आहे.
IMD Instructions: हवामान विभागाकडून प्रशासनाला 5 महत्त्वाच्या सूचना
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन IMD ने राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनांना तातडीने पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
1. पाणी साठा आणि संवर्धनाच्या उपाययोजना राबवाव्यात.
2. शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करावे.
3. उष्माघाताच्या दृष्टीने थंड निवारा केंद्रे सुरू ठेवावीत.
4 पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.
5 आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.
दरम्यान, हवामान विभाग जुलै 2026 या महिन्याचा पावसाचा सविस्तर अंदाज जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार आहे.
















