आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sunetra Pawar : सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीत जागावाटपावरून खलबतं सुरू आहेत. तिन्ही पक्षातील सर्वोच्च नेत्यांच्या बैठका होत आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे यासारख्या जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावर चर्चा केली जात आहे. दरम्यान, एकीकडे जागावाटपाचे गुऱ्हाळ चाललेले असताना सुनेत्रा पवार यांच्या एका पत्राची चांगलीच चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आनंद परांजपे यांची नियुक्ती थांबवा अशी मागणी केली आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचे सांगिले जात आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आनंद परांजपे यांची म्हाडाचे उपाध्यक्ष म्हणून करू नये. त्याऐवजी आम्ही लवकरच तुम्हाला दुसरे नाव सूचवू, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्या या कथित पत्राची सगळीकडे चर्चा होत आहे.

आनंद परांजपे यांनी दिला होता राष्ट्रवादीचा राजीनामा
गेल्या काही दिवसांपासून आनंद परांजपे हे नाव चांगलेच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 मे रोजी त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादी पक्षात नाराज आहेत, असे बोलले जात होते. विशेष म्हणजे विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात होते.
म्हणून सुनेत्रा पवार यांनी पाठवले पत्र
हा अंदाजही खरा ठरला. राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळेच आता सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, असे म्हटले आहे. तसेच परांजपे यांच्या जागी लवकरच आम्ही नवे नाव देऊ असे, सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
















