टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

On: May 28, 2026 1:53 PM
Follow Us:

US Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्हं दिसत आहेत. इराणकडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले केले जात असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली :   अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु असतानाच युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत. अमेरिकेनं इराणमधील अब्बास पोर्टजवळ हल्ले केले होते. अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनं अमेरिकन लष्करी तळावर हल्ले केल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकन लष्करी तळावर इराणचे हल्ले

इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले सुरु करण्यात आल्यानंतर कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले रोखले जात असल्याचं कुवेतनं म्हटलं आहे. इराणची वृत्तसंस्था तसनीमच्या रिपोर्टनुसार इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डसकडून स्थानिक वेळ 4.50 वाजता अब्बास पोर्टजवळ अमेरिकेकडून हल्ले करण्यात आल्यानंतर अमेरिकन लष्करी तळावर प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. आयआरजीसीनं अमेरिकेच्या कोणत्या लष्करी तळावर हल्ले केले हे सांगितलं नाही.

IRGC चा थेट इशारा

IRGC ने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे, जर अशा प्रकारचे हल्ले पुन्हा करण्यात आले तर इराणकडून निर्णायक उत्तर दिलं जाईल. याच्या गंभीर परिणामांसाठी अमेरिका (हल्ले करणारे) जबाबदार असेल.  या हल्ल्यांचा परिणाम शेजारच्या देशांवर दिसून येतोय, असं आयआरजीसीनं म्हटलं.

कुवैतमध्ये दहशत

कुवैतनं अचानक निर्माण झालेल्या संकटाच्यापार्श्वभूमीवर अधिकृतपणे माहिती देत म्हटलं की त्यांच्या हवाई क्षेत्राकडे  क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केला जातोय, त्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सला हवेत नष्ट केलं जात आहे. बुधवारी रात्री अमेरिकेनं इराणवर हवाई हल्ले केले होते. रिपोर्टनुसार अब्बास शहराच्या पूर्व भागात तीन स्फोटांचे आवाज  ऐकायला मिळाले.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमरेरिकन अधिकाऱ्यानं म्हटलं की सैन्यानं रात्रभर इराणमध्ये नव्यानं हल्ले केले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन लष्कर आणि व्यावसायिक सागरी वाहतुकीसाठी संकट ठरणाऱ्या इराणच्या लष्करी ठिकाणावर हल्ले करण्यात आले.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यानंतर देखील तोडगा निघालेला नाही. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणवर हल्ले सुरु केले होते. त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकन लष्करी तळ असणाऱ्या आखाती देशांमध्ये हल्ले केले होते. इस्त्रायल, यूएई, कुवैत यासह इतर देशांमध्ये इराणनं हल्ले केले होते. ट्रम्प यांनी इराणसोबत करार होणार असल्याचे दावे केले होते. मात्र, इराणकडून युरेनियमच्या मुद्यावर अमेरिकेपुढं न झुकण्याची भूमिका घेतली आहे. आता अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now