maharashtra
तुम्हाला फटाक्यांचा त्रास होतोय, मग आम्हाला वर्षभर भोंग्यांचा किती होत असेल – मनसे
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर मशिदींवरील भोंग्यांचा मद्दा उपस्थित केला आहे. रात्रीचा 1 वाजून गेला तरी, फटाके वाजत असल्याचे एका मुस्लीम व्यक्तीने मुंबई पोलिसांना ट्विट केले. त्यावर मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी उत्तर देताना ‘दिवाळी असल्याने सहन करा’ असा सल्ला दिला. तुमची भोंग्यावरील अजान आजही सुरु आहे, असेही त्यांनी म्हटले.
दिवाळीनिमित्त मुंबईच्या अनेक भागांत सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यात आले. मात्र, रात्रीच्या 1 वाजताही फटाके फोडत होते. त्यामुळे एका मुस्लीम व्यक्तीने ट्विटरला मुंबई पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली. सलमान खान नावाच्या व्यक्तीने, रात्रीचे 2 वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचे ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती.
ट्विटनंतर मनसेने त्याला प्रत्युत्तर दिले. चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर केले असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विचार करा, मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडे सहन करा कारण दिवाळी आहे, असे त्यांनी म्हटले.