तब्बल ९०० वर्षांची परंपरा लाभलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेत यंदा कार्निवल सिटी, एस. के. सरकार भूत बंगला हे नवे आकर्षण भाविकांसाठी आहेत. तसेच दरवर्षी संस्कार भारतीतर्फे घालण्यात येणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्यांच्या सेवेत यंदा संपूर्ण भारतातून तब्बल ५०० रंगवली कलाकार सहभागी होऊन रांगोळ्यांच्या पायघड्यांच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१३ ते १७ जानेवारी या काळात श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधी आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीने केलेली तयारी यांची माहिती काडादी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गड्डा यात्रेत गृहपयोगी वस्तू, हस्तकला, चित्रकला, विणकाम आदी दुकाने खाद्यपेयांची दुकाने, दागिने, खेळण्यांची दुकाने, असतील. तसेच रेंजर पाळणा, टॉवर पाळणा, आकाश पाळणे, ऑक्टोपस, ट्विस्टर, मौत का कुवा, ब्रेक डान्स, गाढवाची कसरत, सेलंबो, मिनी ड्रॅगन रेल, कटर पिलर, मेरीगो राऊंड, डॉग शो, नावाडी, कोलंबस, नागकन्या, टोरा टोरा आधीदी साधनेदेखील राहणार आहेत. त्याचबरोबर घरगुती साहित्य विक्रीची दालने, डिस्ने लँड, सौंदर्य प्रसाधने, फोटो सेंटर, रेडीमेड गारमेंट तसेच दिल्ली येथील हॉटेल, वडापाव, बटाटा वडा, चिवडा विक्री अशी दुकाने थाटण्यात येत आहेत.
—————–
संस्कार भारतीतर्फे तीन किलोमीटर लांब रांगोळ्यांच्या पायघड्या
दरवर्षीप्रमाणे नंदीध्वज मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीतर्फे तीन किलोमीटर लांब रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. कसबा पेठेतील वाड्यापासून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यापर्यंत या पायघड्या असतील. यात गोपद्म, केंद्रवर्धिनी, शृंखला, सर्परेषा आदी मंगल चिन्हे रेखाटली जातील. संस्कार भारतीची ही परंपरा गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यंदाही अतिशय सुरेख रांगोळी पायघड्या भाविकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी कला फाउंडेशनकडून पसारे वाडा ते विजापूर वेस या मार्गावर पायघड्या घालण्यात येणार आहेत.
लेझर शो चेही असेल आकर्षण
१६ जानेवारी रोजी होम मैदानावर परंपरेनुसार शोभेच्या दारूकामाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दारूकामाची आतिशबाजी आणि लेझर शोचे देखील नियोजन केले आहे. लेझर शो मधून श्री सिद्धरामेश्वर यांचे जीवन चरित्र, समाज प्रबोधनात्मक संदेश दाखवण्यात येणार आहेत. याकरिता बेंगलोर येथील नामांकित कंपनीस लेझर शो सादर करण्यासाठी देवस्थान समितीने निमंत्रित केले आहे, असेही काडादी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस यात्रा समितीचे प्रमुख सिद्धेश्वर बमणी, जागा वाटप समितीचे प्रमुख भीमाशंकर पटणे, मिरवणूक समितीचे प्रमुख ॲड. मिलिंद थोबडे, रंग व विद्युत रोषणाई समितीचे प्रमुख शिवकुमार पाटील, पशु प्रदर्शन व विक्री समितीचे प्रमुख काशिनाथ दर्गोपाटील, कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे आदी उपस्थित होते.