फॉक्सकॉनसह टाटा-एअरबस या प्रकल्पांसह आणखी दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं. याशिवाय सत्ताधाऱ्यांनी हे प्रकल्प महाविकास आघाडीच्या शासनकाळातच गुजरातला गेल्याचा दावा केला होता. परंतु आता राज्यातील प्रकल्प कुणामुळं आणि कोणत्या कारणांमुळं महाराष्ट्राबाहेर जात आहे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन-तीन प्रकल्प कुठे गेलेत, हे माहितीच्या अधिकारातून समोर आलेलं आहे. आता ते कुणामुळं गेलेत, कधी गेलेत?, हे सुद्धा लवकरच समोर येणार आहे. राज्यातील उद्योगधंदे कुणामुळं बाहेर गेले, हे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडलेलं आहे.
मोदी सरकार हे राज्य सरकारच्या पाठिशी असून विकासासाठी १४ हजार कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मोदी सरकार राज्याच्या विकासाला एक रुपयाही कमी करत नसून आमच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात नवे औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळं राज्यातील लाखो तरुणांना फायदा होणार असल्याचं शिंदे म्हणाले.