दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थांना अभ्यासाचे नियोजन करता येईल. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना काळात दिलेल्या सवलती शिक्षण मंडळाने रद्द केल्या आहेत.
कोरोना काळात विद्यार्थांना त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र देण्यात आले होते. तसेच ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. ही सवलत शिक्षण मंडळाने रद्द केली आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
कोरोना काळात शाळा व महाविद्यालये बंद होती. शिक्षण ऑनलाईन सुरु होते. त्यामुळे परीक्षेसाठी विशेष नियम तयार करण्यात आले होते. पहिली ते नववीची परीक्षा ऑनलाईन झाली. तसेच बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थांना त्यांच्याच शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षेच्या वेळेत अतिरिक्त ३० मिनिटे देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थांना दिलासा मिळाला होता. आता कोरोनाचे नियम शिथिल झाले आहेत.
ऑनलाईन शिक्षण बंद झाले आहे. शाळा व महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे कोरोना काळात दिलेल्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी कोरोनाच्या आधी असलेले नियम पुन्हा लागू करण्यात आलेले आहेत. विद्यार्थांना त्यांचीच शाळा परीक्षा केंद्र म्हणून न देता पूर्वाप्रमाणे स्वतंत्र परीक्षा केंद्र दिले जाईल. परीक्षेसाठी दिलेला ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळही रद्द करण्यात आला आहे.