पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा टी 20 विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. त्यानंतरच्या चारही सामन्यांमध्ये आफ्रिदीने विकेट्स घेतल्या. बुधवारी टी 20 विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. आफ्रिदीने या सामन्यातही पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली होती. तो डावाचे पहिलेच षटक टाकताना असे काही घडले, जे क्वचितच क्रिकेट विश्वात पाहायला मिळाले असेल.
न्यूझीलंड संघ या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीला उतरला होता. डावाचे पहिलेच षटक शाहीन आफ्रिदी टाकत होता. पहिल्या चेंडूवर फलंदाज फिन ऍलेन याने ऑफ साईडच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू त्याच्या पॅडवर लागला आणि पंच मरे इरॅस्मस यांनी त्याला बाद घोषित केले. मात्र, ऍलेनने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागला होता.
टीव्ही पंचांनी ऍलेनला नाबाद घोषित केले. आफ्रिदीचा तिसरा चेंडू पुन्हा ऍलेनच्या पॅडवर लागला. यावेळीही पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यानंतर ऍलेनने पुन्हा रिव्ह्यू घेतला. मात्र, यावेळी चेंडू बॅटला लागला नव्हता आणि यष्टींना लागत होता. टीव्ही पंचांनी त्याला बाद घोषित केले.