पूर्वी वयाच्या 60 नंतर होणारा आजार हल्ली लहान वयातील मुलांना सुद्धा होऊ लागला आहे. मधुमेह कायमस्वरूपी बरा करता येत नसला तरीही डाएटमध्ये बदल करून व लाईफस्टाईल सुधारून तो कंट्रोल नक्कीच करता येतो. यासाठी डायबिटीजची लक्षणे व कारणे आणि आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा व कोणते पदार्थ खाणे टाळावे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

चुकीच्या लाईफस्टाईलचा परिणाम
धक्कादायक म्हणजे गेल्या ५ वर्षांत १५ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये ‘टाईप २’ मधुमेहाचे प्रमाण ४०% नी वाढले आहे. जेव्हा एखाद्या तरुण व्यक्तीला समजते की त्यांना आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावे लागेल, तेव्हा ती केवळ एक शारीरिक व्याधी नसते, तर तो एक मोठा मानसिक धक्का असतो. आपण आपल्या मुलांना गोड खाऊ घालताना नकळत त्यांना एका संकटाकडे ढकलत आहोत का, हा प्रश्न आज प्रत्येक पालकाला सतावू लागला आहे. म्हणूनच डायबिटीज हा केवळ एक आजार नसून तो आपल्या बदललेल्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे हे समजून घेणे काळाची गरज आहे.
डायबिटीज कसा होतो आणि त्याचे प्रकार
![]()
आपण जे अन्न खातो, त्याचे रूपांतर साखरेत होते आणि ही साखर पेशींपर्यंत नेण्यासाठी स्वादुपिंडातील (Pancreas) इन्सुलिनची गरज असते. जेव्हा हे इन्सुलिन कमी पडते, तेव्हा डायबिटीज किंवा मधुमेह होतो. याचे मुख्य दोन प्रकार आहेत:
टाईप 1
हा बहुतेकदा जन्मापासून किंवा लहानपणी होतो. टाईप १ मधुमेहामध्ये आजार झपाट्याने विकसित होतो आणि तो प्रामुख्याने ‘ऑटोइम्यून’ प्रतिक्रियेमुळे होतो. या प्रक्रियेत शरीर चुकून स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशी नष्ट करते. त्यामुळे काही दिवसांत किंवा आठवड्यांतच लक्षणे दिसू लागतात. गोवर, गालगुंड, MMR लस किंवा इतर व्हायरल संसर्गानंतर काही मुलांमध्ये मधुमेह विकसित होऊ शकतो. अशा प्रकारची अचानक सुरुवात टाईप १ मधुमेहात आढळते.
टाईप 2
- टाईप २ मधुमेह अनुवांशिक घटकांबरोबरच जीवनशैलीमुळे होतो. आई-वडिलांकडून आलेला कौटुंबिक इतिहास, इन्सुलिन रेझिस्टन्स, लठ्ठपणा, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव ही कारणे महत्त्वाची आहेत. यामध्ये लक्षणांची सुरुवात हळूहळू होते. वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, वजन घटणे आणि सतत थकवा जाणवणे ही सामान्य चिन्हे आहेत.
- टाईप १ मधुमेहात व्हायरल संसर्ग हे ट्रिगर ठरू शकतात, तर टाईप २ मधुमेहासाठी अस्वस्थ आहार पद्धती, साखरयुक्त पेये वारंवार पिणे, गोड पदार्थांची तीव्र इच्छा, जास्त भूक लागणे आणि कायम सुस्ती जाणवणे हे चेतावणीचे संकेत ठरू शकतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेतल्यास मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
‘जागतिक आरोग्य संघटना’ (WHO) नुसार, अनुवांशिकता, लठ्ठपणा आणि वाढलेले वय हे मुख्य धोके आहेत. मात्र, आजकाल ज्यांच्या रक्ताचे नातेवाईक मधुमेही आहेत किंवा ज्यांची शारीरिक हालचाल शून्य आहे अशा लोकांना मधुमेह होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
‘बैठी जीवनशैली’ व ‘जंक फूड’चे अतिसेवन धोक्याचे
![]()
इंटरनेशनल जर्नल ऑफ मेडिकल एंड फार्मास्युटिकल रिसर्च मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, मैदानी खेळांचा अभाव आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे, जो डायबिटीजचे मुख्य कारण आहे. याशिवाय, अतिप्रक्रिया केलेले अन्न (Processed foods) साखरेचे प्रमाण जास्त असलेले कोल्ड ड्रिंक्स लहान मुलांच्या स्वादुपिंडावर ताण निर्माण करतात. कमी झोप आणि लहान वयात वाढलेला मानसिक ताण (Stress) यामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ हार्मोन वाढते, जे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडवते.
डायबिटीजची लक्षणे व धोक्याचे संकेत काय?
- मधुमेह शरीरात शिरताना काही स्पष्ट संकेत देतो.
- वारंवार तहान लागणे
- जास्त भूक लागणे
- रात्री वारंवार लघवीला जावे लागणे
- दृष्टी अंधुक होणे
- जखम लवकर बरी न होणे
- हातापायांना मुंग्या येणे
- अचानक वजन कमी होणे
हे धोक्याचे संकेत आहेत. जर तुम्हाला विनाकारण सतत थकवा जाणवत असेल, तर ती रक्तातील साखर वाढल्याची निशाणी असू शकते. अशा वेळी त्वरित ‘HbA1c’ चाचणी करणे सुरक्षित ठरते.
डायबिटीज करतो हृदय, डोळे व किडनीवर परिणाम
मधुमेह हा असा आजार आहे जो शरीराच्या प्रत्येक अवयवावर घाला घालतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील एका अहवालानुसार, रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे हृदयविकाराचा (Heart Attack) धोका २ ते ४ पटीने वाढतो. किडनीवर (Nephropathy) ताण येऊन ती निकामी होऊ शकते. डोळ्यांच्या नसा खराब झाल्यामुळे अंधत्व (Retinopathy) येऊ शकते. तसेच, पायांमधील रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे छोट्या जखमेचे रूपांतर मोठ्या जखमेत होऊन पाय कापण्याची वेळ (Amputation) येऊ शकते. म्हणूनच याला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते, कारण तो आतून शरीर पोखरत असतो.
मधुमेह टाळणे किंवा कंट्रोल करणे पूर्णपणे आपल्या हातात
- ‘हार्वर्ड हेल्थ’ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आहारात ‘कॉम्प्लेक्स कार्ब्स’ (उदा. नाचणी, जवस, ओट्स) यांचा समावेश करा.
- साखर, मैदा पूर्णपणे टाळा.
- दिवसातून किमान ४५ मिनिटे वेगाने चालणे आणि व्यायाम करणे यामुळे रक्तातील साखरेची पातळी ३०% पर्यंत कमी करू शकते.
- तणाव कमी करण्यासाठी योगासने आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.
- अन्नामध्ये फायबरचे (भाज्या, सॅलड) प्रमाण वाढवा.
- वजन केवळ ५% नी कमी केल्यास टाईप-२ मधुमेहाचा धोका ५०% नी कमी होतो.
डायबिटीज होऊ नये व ब्लड शुगर कंट्रोलसाठी लाईफस्टाईल बदला
याचाच अर्थ डायबिटीज हा एक चुकीच्या जीवनशैलीशी निगडीत आजार असल्यामुळे तो कमी वयात सुद्धा होतो. खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, नियमित व्यायाम, व्यसनं व जंक फूड टाळून आणि जेवणात जास्तीत जास्त फायबर, प्रोटीन अशा पोषक तत्वांचा समावेश करून हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो किंवा टाळता येऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)










