US Iran Peace Talk: अमेरिका आणि इराण यांच्यात 16 एप्रिलला चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.

US Iran Peace Talk: अमेरिका आणि इराण (US Iran War) यांच्यात 16 एप्रिलला चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता आहे. इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते. पाकिस्तानसह तुर्कीए, इजिप्त आणि सौदी अरेबिया मध्यस्थीसाठी पुढे आले आहेत. संयुक्त राष्ट्रांकडूनही पुन्हा चर्चा करावी, असा दोन्ही देशांना आग्रह करण्यात आला आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (US Iran Peace Talk)
इराणसोबतच्या चर्चेबाबत अमेरिकेचा सूर बदलला आहे. अनेक गोष्टी योग्य दिशेनं गेल्या, असं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मत व्यक्त केलं आहे. सगळं चुकलंच असं नाही, बरंचसं चांगलंही झालं. दोन्ही देशांनी चर्चेत खूप प्रगती केली. इराण अमेरिकेला हवं तसं मान्य करत होतं, असं जेडी व्हान्स म्हणाले. अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणने काही प्रमाणात प्रगती दर्शवली आहे. त्यामुळे इराणने ही अट मान्य केल्याचं बोललं जात आहे. ज्यावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संवादाचा मार्ग आता मोकळा होत असल्याचे संकेत मिळतात. एका सर्वसमावेशक आणि यशस्वी कराराद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा या वाटाघाटी विनाकारण लांबवण्याचा कोणताही इरादा नाही, असं जेडी व्हान्स यांनी स्पष्ट केलं. (US Iran Peace Talk)
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? (Donald Trump Iran US War)
माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराण एखादा करार करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. आम्हाला दुसऱ्या बाजूकडून एक संदेश प्राप्त झाला आहे. आम्ही त्यांच्यावर नाकेबंदी (निर्बंध) लादली आहे. त्यांचा कोणताही व्यापार सध्या सुरू नाही. इराणचा कोणताही व्यवसाय सध्या चालत नाही आणि आमचा तो तसाच ठेवण्याचा इरादा आहे. सध्या, तिथे कोणताही संघर्ष किंवा लढाई सुरू नाही, असं ट्रम्प यांनी सांगितले. तसेच इराणला अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही. जर इराणने अटी मान्य केल्या नाहीत, तर कोणताही करार होणार नाही, असं ट्रम्प यांनी सांगितले. (US Iran Peace Talk)
इराण आणि अमेरिकेत पुन्हा एकदा चर्चा- (US Iran Peace Talk)
अमेरिका आणि इराणमध्ये पहिल्या टप्प्यात 21 तास चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. ‘सारं जुळत होतं, मात्र अणुकार्यक्रमावरुन अडलं’ अशी प्रतिक्रिया इराणने दिली आहे. तर इराण पुन्हा चर्चेला आला तरी अडचण नाही अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराण आणि अमेरिकेसह इतर देशांनीही चर्चेचा पुरस्कार केला आहे. यावेळी रशियाचे ब्लादिमीर पुतीन यांनी इराण आणि अमेरिकेच्या चर्चेमध्ये मध्यस्ती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.








