सांगोला (प्रतिनिधी):-श्री.मच्छिंद्रनाथ महाराज पालखीचा रिंगण सोहळा गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी अचकदाणी येथे मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात पार पडला.हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्याचा कार्यक्रम यंदाही अण्णासाहेब पुजारी यांच्या शेतामध्ये पार पडला. नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रिंगण सुरू झाले. या रिंगण सोहळ्यात अश्वाचे पारंपरिक पूजन करण्यात आले आणि शेकडो भक्तांनी अश्वाचे दर्शन घेऊन पुण्यसंचय केला.
शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही पालखी श्री क्षेत्र किल्ले मच्छिंद्रगड (ता.वाळवा) येथून पंढरपूरकडे प्रस्थान करते. सांगोला तालुक्यातून मार्गक्रमण करत असलेल्या या पालखीचा रिंगण सोहळा अचकदाणी (ता.सांगोला) येथे दरवर्षी होत असतो.या सोहळ्यात आठ ते दहा हजार वारकरी व भाविक सहभागी झाले होते.स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा अविस्मरणीय रिंगण सोहळा हजारोंच्या संख्येने उपस्थित असणार्या भाविक भक्तांनी अनुभवला. सांगोला तालुक्यामधून निघणारी ही मच्छिंद्रनाथ महाराज यांची सर्वात मोठी पालखी मानली जाते. नवनाथ संप्रदायातील प्रमुख संत असलेल्या मच्छिंद्रनाथांची पालखी भाविकांमध्ये विशेष श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.
रिंगण सोहळ्याच्या प्रारंभी अश्व पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या पूजनाचा मान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या सुविद्य पत्नी सौ. निकिताताई देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, डॉ.पियुष पाटील, माजी सभापती बाळासाहेब काटकर, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, जि.प. सदस्य किसन माने व अचकदाणीच्या सरपंच रेश्माताई मोरे यांना लाभला.तदनंतर टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने, अनोख्या चैतन्य व भक्तिरसाने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात झेंडेकरी,तुळशी- वृंदावन धारक महिला, टाळकरी, विणेकरी, पोलीस धावले.
संपूर्ण रिंगण सोहळ्याचे यशस्वी आयोजन अचकदाणी गावकर्यांच्या सहकार्याने पार पडले. यावेळी गावातील महिला, युवक मंडळे, वारकरी मंडळे यांनी कार्यरत राहून चोख बंदोबस्त ठेवला होता. अचकदाणी येथे होणारा हा रिंगण सोहळा सांगोला तालुक्यातील एकमेव रिंगण असून तो वारकरी परंपरेत एक वेगळे स्थान राखून आहे.
संपूर्ण रिंगण अलिखित शिस्तीत आणि भक्तिभावाने पार पडले. या दिव्य अनुभवाचे साक्षीदार होण्यासाठी सांगोला तालुक्यासह अचकदाणी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि मनाला भक्तिभावाने न्हालून टाकणारा अशा या रिंगण सोहळ्याने वारकरी परंपरेचा वैभवशाली वारसा पुन्हा एकदा जागवला.
इतर महत्वाच्या बातम्या
सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरच्या स्टुडंट कौन्सिलचा शपथविधी समारंभ संपन्न
मोहन हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ.प्रदीप देवकते यांचेकडून हृदयविकाराच्या तज्ज्ञ सेवा