सांगोला (प्रतिनिधी): ज्याच्यावर विश्वास टाकून २.५ लाखांची रोकड सोपवली, त्याच ड्रायव्हरने आपल्या मित्रांच्या मदतीने भररस्त्यात दरोड्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी अत्यंत चातुर्याने तपास करत ड्रायव्हरसह चौघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकी घटना काय?
कोल्हापूरचे फिर्यादी दिलीप भागोजी पाटील (वय ५८) हे आपल्या पत्नीसह घराच्या बांधकामासाठी २.५ लाख रुपये रोख घेऊन सांगोला-पंढरपूर रोडने प्रवास करत होते. रात्री ११ च्या सुमारास एका विनाक्रमांक काळ्या रंगाच्या ‘थार’ गाडीने त्यांचा पाठलाग करून त्यांची कार अडवली. गाडीतून उतरलेल्या इसमांनी फिर्यादींशी हुज्जत घालत पैशांची बॅग, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल हिसकावून सोलापूरच्या दिशेने पळ काढला होता.

तपासातील नाट्यमय वळण
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सुई फिर्यादीचा ड्रायव्हर रामचंद्र बापू साळुंखे (वय ४५, रा. कोल्हापूर) याच्याकडे वळली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
* असा रचला कट:
ड्रायव्हर रामचंद्रनेच आपल्या कोल्हापूरमधील मित्रांना गाडीत मोठी रोकड असल्याची ‘टीप’ दिली होती आणि दरोड्याचा बनाव रचला होता.
* पकडले गेलेले आरोपी:
रामचंद्र साळुंखे (ड्रायव्हर), गौशपाक उर्फ मुन्ना जमादार (थार मालक), संदिप मेडगुळे आणि महेश कांबळे.
पोलीस कारवाई
सांगोला पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ‘थार’ गाडी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलिसांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करत आहेत.










