भयंकर! स्विफ्ट कार थेट कॉलेज तरुणींच्या घोळक्यात घुसली, मुलीला 100 फूट फरफटत नेलं

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Kolhapur Accident: कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात एका हृदयद्रावक घटनेत, अल्पवयीन मुलांनी भरधाव कार थेट बस थांब्यावर उभ्या असलेल्या मुलींच्या घोळक्यात घुसली. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाल्या.

कोल्हापूर: कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने स्टंटबाजी करत भरधाव चारचाकी गाडी बस थांब्यावर उभ्या असलेल्या मुलींच्या घोळक्यात घुसवल्याने एका मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींबाबत गुरुवारी कॉलेज सुटल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

असा होता घटनाक्रम..

कॉलेज सुटल्यानंतर राधानगरी तालुक्यातील कुरकली गावाजवळील एसटी बस थांब्यावर जवळपास 50 विद्यार्थी/विद्यार्थिनी बसची वाट पाहत उभे होते. दुपारी अंदाजे 1.30 च्या सुमारास, भरधाव चारचाकी गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी मारुती स्विफ्ट  ही गाडी थेट मुलींच्या घोळक्यात घातली. या धडकेत एक विद्यार्थिनी गाडीखाली आल्याने तिला 100 मीटर फरफटत गेली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्वरीत मदत मिळवून जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर न थांबता चालक आणि त्याचे सहकारी गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले होते. मात्र घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी तात्काळ पाठलाग करत भोगावती येथील ठीकपूर्ली फाट्यावर ही गाडी अडवली. गाडीतील चालकासह दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा केला असून सीपीआर रुग्णालयामध्ये दोषींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

बघ्यांची मोठी गर्दी..
या अपघातात 18 वर्षीय प्रज्ञा दशरथ कांबळे (रा. कौलव, ता. राधानगरी) हिला आपला जीव गमवावा लागला. तर अस्मिता अशोक पाटील (रा. कौलव), श्रावणी उदय सरनोबत (रा. कसबा तारळे) व श्रेया वसंत डोंगळे (रा. घोटवडे) या तिघी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी आणि सीपीआर रुग्णालयासमोर नातेवाईक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली होती.

अभ्यासात हुशार, मात्र नियतीने हिरावले स्वप्न..
प्रज्ञा ही बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी होती. तर एका शाळेत प्रज्ञाचे वडील शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मुलगी अभ्यासात हुशार असल्याने वडील मिळेल ते काम करुन मुलीला उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र प्रज्ञाच्या अशा अपघाती निधनाने कुटुंबातील प्रत्येकाचं मन सुन्न झालं आहे. या घटनेनं कौलव गावावर आणि महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे. तर या प्रकरणाची गंभीर स्वरूपात दखल घेऊन प्रशासनाने दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत पालकांनीही मुलांना अशा प्रकारे गाडी हाताळायला देऊ नये, असे आवाहन भोगावती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष दिंगबर मेडसिंगे यांनी केलं आहे.

पालकच आहेत जबाबदार..
अल्पवयीन मुलाकडे चारचाकी गाडी चालवण्यास दिल्याप्रकरणी, संबंधित मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर, गाडीचे मालक असलेल्या त्याच्या चुलत्यालाही जबाबदार धरत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, रात्री उशिरा दोघांनाही अटक करण्यात आली आहे. करवीर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon