सोलापूर, 12 फेब्रुवारी (हिं.स.)।आमदार नसलो तरी तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावणारच. केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे तालुक्यातिल प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येणार नाहीत. काही नेत्यांच्या पक्षांतराबाबत बोलणार नाही, मी शिंदे साहेबांचा एकनिष्ठ भक्त असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या आठवड्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे सर्वत्रच वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळी आमदार राहिलेले शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात सुमारे साडेपाच हजार कोटींच्या विकास कामांसाठी निधी आणला होता.एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सर्वात पुढे असणारे शहाजीबापू हे एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. या विधानसभा निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटलांचा पराभव झाल्यामुळे तसेच गेल्या आठवड्यात दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यामुळे आमदार शहाजीबापू पाटलांचे राजकीय पुनर्वसन होणार का? याबाबत सर्वत्र मत मतांतरे व्यक्त होत आहेत.