सांगोला (प्रतिनिधी):- सप्तम सोशल फाउंडेशन आयोजित शाळा पालकत्वाची 2025 हा आदर्श पालकत्वासाठी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम हा लहान मुलांच्या योग्य विकासासाठी खास कार्यशाळा तसेच बालवयीन विकासात पालकांची भूमिका कशी असावी या विषयास अनुसरून आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये बालसाहित्यिक, बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे सदस्य श्री.फारुक काझी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच बालशिक्षण तज्ञ भामा प्रमोद मॅडम व रश्मी डाके मॅडम आणि यश शहा सर प्रमुख वक्ते तसेच मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्त्यांचे स्वागत सप्तम सोशल फाउंडेशन सांगोलाचे संचालक श्री.चेतन पतंगे यांनी केले. यानंतर सप्तम सोशल फाउंडेशन सांगोलाचे संचालक डॉ.मकरंद येलपले यांनी क्रिटिकल थिंकिंग् म्हणजेच तर्कशुद्ध विचारशक्ती चिमुकल्यांमध्ये कशी विकसित करावी याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर बालशिक्षणतज्ञ भामा प्रमोद मॅडम यांनी बालवयीन मानसिकता, चिमुकल्यांसाठी योग्य आहाराची माहिती, पारंपारिक शिक्षण पद्धती आणि कृतीयुक्त अध्ययन पद्धती मधील फरक त्यांनी प्रात्यक्षिक रित्या उपस्थित पालकांना सोप्या आणि आकर्षक पद्धतीने स्पष्ट केला व लिटल मिलेनियम प्री स्कूल सांगोला मध्ये चिमुकल्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होतो याची माहिती दिली.
रश्मी डाके मॅडम यांनी बालवयातील मोबाईलचे दुष्परिणाम, मुलांचा सामाजिक,मानसिक आणि शारीरिक विकास या महत्त्वाच्या विषयांवर उपस्थित पालकांचे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे श्री. फारुख काझी सर यांनी बालवयीन मानसिकता, पालकांचा बालविकासातील सहभाग आणि पालकत्व या संज्ञांची विस्तारित माहिती पालकांना दिली तसेच जेन झी,जेन अल्फा या पिढ्यांमधील फरक सांगितला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कांबळे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये सप्तम सोशल फाउंडेशन संचलित लिट्ल मिलेनियम प्रिस्कूल सांगोला च्या सीएलओ मनिषा पाटील, शिक्षिका आयेशा मुजावर, पूजा पतंगे तसेच सप्तम सोशल फाउंडेशन सांगोलाचे सर्व संचालक – डॉ. अनुप तोरणे, डॉ.रिना तोरणे, डॉ.बसवेश्वर पाटील, सौ.प्रतिभा पाटील, श्री.चेतन पतंगे, सौ.पूजा पतंगे, सीए जुबेर मुजावर, सीए तबस्सुम मुजावर, डॉ.मकरंद येलपले, डॉ.शीतल येलपले, श्री.प्रकाश पाटील, सौ.अनघा पाटील आणि डॉ. विजय फुले, डॉ.शीतल फुले यांनी कार्यक्रमास शोभा आणली. कार्यक्रमाचे आभार संचालक श्री अनुप तोरणे यांनी केले.