टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

संत सोपानदेव पालखी सोहळ्याला वेग; पालखीचे 12 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारीनिमित्त ७ जुलै रोजी देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तर ८ जुलै रोजी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ११ जुलै रोजी सासवड येथे दाखल होणार आहे.

संत सोपानदेव पालखी सोहळ्याला वेग

सासवड : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवड येथून १२ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. संत सोपानदेव देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, हजारो वारकरी आणि भाविक या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख अॅड. त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली.

आषाढी वारीनिमित्त ७ जुलै रोजी देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तर ८ जुलै रोजी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ११ जुलै रोजी सासवड येथे दाखल होणार असून, त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांची पालखी १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मंदिराच्या देऊळवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान होणार असून, पहिल्या दिवशी पिंपळे येथे दुपारचा विसावा तर पांगारे येथे रात्रीचा मुक्काम असेल. त्यानंतर पालखी विविध गावांतून मार्गक्रमण करत बारामती, इंदापूर, अकलूज मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

वारकरी संप्रदायासाठी विशेष आकर्षण

यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी विसावे, नैवेद्य, रिंगण सोहळे आणि वारकऱ्यांच्या स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे १५ जुलै रोजी पहिले गोल रिंगण, तर १८ जुलै रोजी पिंपळी येथे पहिले बकरी रिंगण होणार आहे.

25 जूनपर्यंत कामे पूर्ण करा

दुसरीकडे, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्ध मंडप येथील पायऱ्या ही कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावीत. तसेच पश्चिमद्वार चे काम तात्काळ सुरू करून आषाढी वारी पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, सीसीटीव्ही कंट्रोल रूम, वाखरी पालखीतळ तसेच वाखरी ते पंढरपूर महामार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

पालखीचे प्रमुख आकर्षण

– १२ जुलै : सासवड येथून पालखी प्रस्थान
– १५ जुलै : वाघळवाडी येथे पहिले गोल रिंगण

– १८ जुलै : पिंपळी येथे पहिले बकरी रिंगण
– २२ जुलै : टप्पा येथे बंधूभेट सोहळा

– २३ जुलै : वाखरी येथे उभे रिंगण व पालखी भेटी
– २४ जुलै : पंढरपूर येथे पालखी आगमन

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा