आता रम्मीला राज्य खेळाचा दर्जा…; कोकाटेंच्या खातेबदलावर विरोधकांचा हल्लाबोल

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ऑनलाइन रम्मी खेळल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला. यावर विविध राजकीय पक्षांनी तीव्र टीका केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे नेत्यांनी कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे आणि सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे. माणिकराव कोकाटेंवर आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे क्रीडामंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रीपद देण्यात आले आहे. ऑनलाईन रम्मी खेळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलावर विविध नेत्यांनी टीका केली आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नुकतंच माणिकराव कोकाटेंवर ट्वीट करत निशाणा साधला. यावेळी दानवे यांनी एक कविता केली आहे. “विकूनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर, नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर..; शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा, पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा.. माफी मागा पुन्हा बरळा, हा फंडा चांगलाय, डर कशाला कोणाचा, बॉस वर्षा बंगल्याबर बसलाय.. वेडे-वाकडे बोलणे-वागणे टिकवी मंत्र्यांचा ‘ताज’, आता नको मैदान, रम्मी खेळायला बसा महाराज”, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

शरद पवार गटाची टीका

यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटानेही यावर टीका केली आहे. “महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी व तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो, अथवा न मिळो… मात्र महायुतीमधील मंत्र्‍यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं… रम्मी राव यांचं मनपूर्वक अभिनंदन”, अशी खोचक टीका शरद पवार गटाने केली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी टीका केली.

रोहित पवारांचा हल्लाबोल

“कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील. तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ही अपेक्षा.

कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा! शिंदे साहेब जेव्हा गावाला किंवा दिल्लीला जातात, तेव्हाची परिस्थिती म्हणजे …‘अंतर्गत कुरघोड्यांचा पुन्हा सुरू झाला खेळ आणि आल इज़ नॉट वेल सांगण्याची आली वेळ’…असाच त्याचा अर्थ असतो. मित्रपक्षाकडून होणाऱ्या कुरघोड्यांची चिड शिंदे साहेबांना नक्कीच असेल. असो, जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या निष्क्रिय सरकारच्या नियमित कृतीशील कुरघोड्यांना महाराष्ट्र देखील कंटाळला आहे हे मात्र नक्की”, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

सुप्रिया सुळेंची टीका

तसेच सुप्रिया सुळे यांनीही माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलावर भाष्य केले आहे. “राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“महाराष्ट्र शासनाला ‘भिकारी’ म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे”, असेही सुप्रिया सुळेंनी सांगितले.

राजू पाटील यांची टीका

तसेच मनसे नेते राजू पाटील यांनीही यावर टीका आहे. “रम्मी’ला राज्य खेळाचा दर्जा नाही दिला म्हणजे मिळवले ! …..ह्यांचा काहीच भरवसा नाही. एकंदरीतच सध्याचा कारभार व त्यातुन बाहेर पडणाऱ्या भ्रष्टाचाराच्या कथा पाहता ‘त्यांचा’ दर्जा घसरलेलाच आहे , त्यामुळे काहीही शक्य आहे !”, असे राजू पाटील यांनी म्हटले

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon