Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न होता, रोहित शर्माचा हा शेवटचा वनडे सामना आहे का? टीम इंडियाच्या विजेतेपदानंतर कॅप्टन रोहित शर्माने याबद्दलची स्थिती स्पष्ट केलीय.
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आणखी एक मोठं विजेतेपद मिळवून दिलं आहे. संपूर्ण देश चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदामुळे आनंद, उत्साहात आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली आधी मागच्यावर्षी टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टुर्नामेंट जिंकली आहे. या स्पर्धेकडे मिनी वर्ल्ड कप म्हणून पाहिलं जातं. दुबईमध्ये काल फायनल मॅच झाली. त्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर चार विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाच जिंकणार हा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात विश्वास होता. पण रोहित शर्मा विजेतेपदानंतर निवृत्तीची घोषणा करणार की काय? अशी सुद्धा भिती होती. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर या सर्व शक्यता आणि अफवांना पूर्णविराम दिला आहे. रोहितने स्पष्ट केलय की, या फॉर्मेटमधून तो सध्यातरी निवृत्त होणार नाहीय.
या फायनलआधी असा अंदाज लावला जात होता की, रोहित शर्मा विजेतेपद मिळवल्यानंतर त्याच्या निवृत्तीची घोषणा करु शकतो. रोहित शर्माची हा त्याचा शेवटचा वनडे सामना असेल अशी देखील चर्चा होती. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विजेतेपद मिळवल्यानंतर रोहित शर्मा त्याच्या निवृत्तीच्या विषयावर काय बोलतो? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. रोहित शर्मा प्रेजेंटेशनच्यावेळी या बद्दल काही बोलला नाही. सगळ्यांच्या नजरा प्रेस कॉन्फरन्सवर होत्या. यावेळी भारतीय कर्णधाराने सर्वांना एकदम स्पष्ट संदेश दिला.
फायनलमध्ये कॅप्टन इनिंग
टीम इंडिया चॅम्पियन बनल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. पत्रकार परिषद संपवून रोहित जाण्यासाठी म्हणून जागेवरुन उठला, त्याचवेळी तो बोलला, एक गोष्ट सांगायची आहे. “अजून एक शेवटची गोष्ट…मी या फॉर्मेटमधून रिटायर होत नाहीय. पुढे कुठल्याही अफवा पसरु नयेत म्हणून स्पष्ट करतोय” रोहितच्या या वक्तव्याने टीम इंडियाचे चाहते भरपूर खुश आहेत. रोहित फायनलमध्ये कॅप्टन इनिंग खेळला. सर्वात जास्त धावा केल्या व रिटायरमेंटच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
रोहितच्या मनात काय?
रोहितने याआधी सुद्धा अनेकदा आपला हेतू स्पष्ट केलाय. त्याला 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. रोहितला वनडे वर्ल्ड कप जिंकायचा आहे. आधी टी 20 वर्ल्ड कप त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. फक्त वनडे वर्ल्ड कप त्याच्या नेतृत्वाखाली जिंकता आलेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.
आणखी वाचा