Raj Thackeray-Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंकडून आज दुसरं एकत्रित विजयी मेळाव्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा (Shivsena UBT-MNS Melava) साजरा करणार आहेत. वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
विजयी जल्लोष मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटातील (Shivsena UBT) नेत्यांकडून वरळी एनएससीआय डोम येथे पाहणी केली जाणार आहे. याचदरम्यान, ठाकरे बंधूंकडून आज दुसरं एकत्रित विजयी मेळाव्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायलं आहे?, मग ही सुरुवात आहे, असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सर्वांना दुसरं जाहीर खुलं आमंत्रण दिलं आहे.
ठाकरे बंधूंच्या पहिल्या आमंत्रणात काय होतं?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काल पहिलं एकत्रित पत्रक काढत सर्वांना आवाहन केलं. आवाज मराठीचा…असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं…आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…आम्ही वाट बघतोय…, असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आले आहे.