Rajgad accident: या प्रकरणी राजगडमधील वेल्हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरं बस खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, वेल्हे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता अंधाऱ्या रात्री बचावकार्य राबवून सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक संदीप तुकाराम गायकवाड (वय ४७) हे अंधेरी (पूर्व), मुंबई येथून ट्रॅव्हल्समधून सुमारे २० प्रवाशांना राजगड किल्ल्यावर सहलीसाठी घेऊन येत होते. शनिवारी रात्री पाबे घाट उतरत असताना पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळून अनेक वेळा पलटी झाली. अपघातानंतर वाहनाचा चुराडा झाला. अनेक प्रवासी वाहनात अडकून पडल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अत्यंत कठीण परिस्थितीत, अंधार, मुसळधार पाऊस आणि खोल दरी यांचा सामना करत हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, कृष्णा मरगळे यांनी धाडसी बचावकार्य केले. तसेच वेल्हे पोलीस स्टेशनचे आकाश पाटील, पंकज मोघे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी बचाव मोहिमेत मोलाची भूमिका बजावत जखमींना सुरक्षित बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले.














