राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त विजयी मेळावा ५ जुलै २०२५ रोजी वरळी येथे होणार आहे. मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची चर्चा रंगली आहे. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येत मराठीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या ५ जुलै २०२५ रोजी वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुंबई, ठाणे यांसह राज्यभर बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. या बॅनरबाजीतून सर्वांना विजयी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी
मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात ठाकरे येत आहेत… तुम्हीही नक्की या, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठीचा विजयी मेळावा, ठरलं ५ जुलै…. ठाकरे येत आहेत… तुम्हीही नक्की या, एन.एस.सी.आय डोम, वरळी, मुंबई, शनिवारी ५ जुलै २०२५ सकाळी १० वाजता, असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे. तर दुसरीकडे त्याच परिसरातील एका बॅनरवर आवाज मराठीचा-कोणताही झेंडा नाही, फक्ती मराठीचाच अजेंडा असे नमूद करण्यात आले आहे. त्यावर या मेळाव्याचे निमंत्रक म्हणून राज ठाकरे यांचे नाव असून, उद्धव ठाकरे यांना शुभेच्छुक म्हणून दर्शवले आहे. हा बॅनर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकजुटीचे प्रतीक मानले जात आहे.
महाराष्ट्रात आवाज मराठीचाच, मातोश्रीबाहेर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी
मुंबईतील वांद्रे परिसरात उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्रात आवाज मराठीचाच असा ठळक आशय पाहायला मिळत आहे.
तसेच या ठिकाणी असलेला दुसरा मजकूर मराठी जनतेला भावनिक साद घालत आहे “मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या!! आम्ही वाट बघतोय…!, आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे.” असे या बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. यामुळे ५ जुलै रोजी मराठी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन दोन्ही ठाकरे बंधूंकडून करण्यात आले आहे.
ठाण्यातील बॅनरमध्ये सरकारला थेट आव्हान
ठाणे शहरातही या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. या ठिकाणी असलेले मनसैनिक आणि शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन खास बॅनर लावले आहेत. या बॅनरवर बाळासाहेबांचा हात दोन्ही ठाकरे बंधूंच्या खांद्यावर ठेवलेला फोटो पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने हे दोघे एकत्र आल्याचे सूचित केले जात आहे.
या बॅनरद्वारे सध्याच्या सरकारला थेट आव्हान देण्यात आले आहे. “महाराष्ट्राची भाषा मराठी पण सरकारला ओढ लागली होती हिंदीची…., महाराष्ट्रात सरकार बसली तिघांची पण जनतेला ओढ लागली दोन भावांची…, सरकारवर वेळ आली जीआर मागे घेण्याची कारण ही एकजूट आहे मराठी जनतेची, मग वाट कसली बघताय महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे का? नेतृत्व मराठीचे…मराठी + ठाकरे = महाराष्ट्र, चला वरळी, असे यात नमूद करण्यात आले आहे.
सध्या मुंबईसह ठिकठिकाणी लागलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीच्या मुद्द्यावर सध्या वातावरण तापलं आहे. यामुळे उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच या मेळाव्याला किती गर्दी होते आणि त्याचे राजकीय पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.