PBKS vs SRH IPL 2026 : मुल्लानपूर येथील महाराज यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

PBKS vs SRH IPL 2026 : मुल्लानपूर येथील महाराज यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावत तब्बल 219 धावांचा डोंगर उभारला. पण प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंगच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने 220 धावांचे डोंगरासारखे लक्ष्य पार केले. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
अभिषेक शर्माचा तुफानी खेळ…
हैदराबादकडून डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या 8.1 षटकांत 120 धावांची भागीदारी उभी केली. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 74 धावांची झंझावाती खेळी साकारली. तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रॅव्हिस हेडनेही साथ देत 23 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 35 धावा केल्या. या दोघांनाही शशांक सिंहने एका षटकात माघारी धाडले.
क्लासेनची संयमी पण महत्त्वाची खेळी…
याशिवाय कर्णधार ईशान किशन (27), अनिकेत वर्मा (19) आणि सलिल अरोरा (9) स्वस्तात बाद झाले. मात्र अखेरच्या षटकांत हेन्रिक क्लासेनने संयमी फलंदाजी करत संघाला 219 धावसंख्या गाठून दिली. त्याने 33 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 39 धावांची खेळी केली. शेवटी जेव्हियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर कूपर कॉनॉलीकडे झेल देत तो बाद झाला.
प्रियांश आर्या अन् प्रभसिमरन सिंग याचं वादळी खेळी….
220 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या डावाची सुरुवात धमाकेदार झाली. सलामीवीर प्रियांश आर्या याने अवघ्या 20 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने ५७ धावांची तुफानी खेळी केली. त्यालाच जोडीदार प्रभसिमरन सिंग यानेही उत्तम साथ दिली. प्रभसिमरनने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 51 धावा ठोकल्या. या दोघांच्या अर्धशतकांमुळे पंजाबने विजयाचा पाया रचला. त्यानंतर श्रेयसने 33 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. ज्यामुळे पंजाबने हे कठीण वाटणारे लक्ष्य 6 गडी राखून सहज गाठले.
हैदराबादचा धुव्वा उडवत गुणतालिकेत घेतली मोठी झेप
या विजयासह पंजाब किंग्सने या हंगामात आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. त्यांनी खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे पंजाब 7 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादसाठी हा पराभव चिंतेचा विषय ठरला आहे. 4 सामन्यांपैकी फक्त 1 विजय मिळवता आला असून 3 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांची स्थिती गुणतालिकेत कमकुवत दिसत आहे.











