Ladki Bahin Yojana : सामाजातील मागास घटकांना न्याय देण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक न्याय विभागावरच अन्याय सुरू आहे. आता पुन्हा एकदा या खात्याचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवल्याचे समोर येत आहे.
सामाजिक न्याय विभागाला आता कोण न्याय देणार? असा सवाल विचारण्यात येत आहे. या खात्याचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याखात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी इतका विरोध करून, खदखद व्यक्त करून आणि नाराजी जाहीर करूनही निधी वळवण्यात आला. विशेष म्हणजे कालच अजितदादा आणि मंत्री शिरसाट यांच्यात बैठक झाली होती. त्यात काय खलबतं झाली हे काही समोर आले नाही. पण आता शिरसाट आगपाखड करणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
लाडक्या बहिणींसाठी निधीच तरतूद करताना सरकारची दमछाक होत असल्याचे पुन्हा समोर आले. या योजनेसाठी गेल्या वेळीच सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता. अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला होता. त्यानंतर मंत्री शिरसाट यांनी अजित पवारांविरोधात टीकेची झोड उठवली होती. गेल्यावेळी सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विभागाचा 1,827 कोटी 70 लाखांचा निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवण्यात आला होता.
बहिणींना दुप्पट ओवळणी
रक्षा बंधन, हे 9 ऑगस्ट रोजी आहे. त्यापूर्वीच राज्य सरकार महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. एकाचवेळी 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा आहे. लाडक्या बहिणींना राज्य सरकार हे अनोखे गिफ्ट देण्याची चर्चा आहे. त्यासाठीच मोठ्या निधीची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित बातम्या





पुन्हा 410.30 कोटींचा निधी वळवला
31 जुलै 2025 रोजी शासनाने एक निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410.30 कोटींचा निधी सामाजिक आणि न्याय विभागाकडून वळता करण्यात आला आहे. शासन धोरणानुसार आणि मंजूर आराखड्यानुसार, हा निधी वळता करण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची भीती व्यक्त होत आहे. आता मंत्री संजय शिरसाट हे या शासन निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.