Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदारांचा पक्षप्रवेश आज नव्हे तर 19 जून रोजी मुंबईतील शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात पार पडेल, अशी माहिती समोर येत आहे.

Operation Tiger UBT Shivsena: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर प्रत्यक्षात येताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार हे अखेर एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले असून त्यांनी उद्धव ठाकरे ( यांची साथ सोडण्याचे निश्चित केल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे हे सहा खासदार बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र देऊन आपण ठाकरे गट सोडला असून आता आपला पाठिंबा शिंदे गटाला असेल, असे स्पष्ट करतील. त्यासाठी ठाकरे गटाचे काही फुटीर खासदार आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. फुटीर खासदारांच्या या गटाला एक केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics news)
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. अधुनमधून हे खासदार एकनाथ शिंदे यांना गुप्तपणे भेटतही होते. मात्र, ठाकरे गट सोडण्याचा त्यांचा निर्णय अंतिम होत नव्हता. मात्र, गेल्या आठवडाभरात यासंदर्भातील हालचालींना वेग आला होता. हे खासदार एकनाथ शिंदेंसोबत जाणार हे लक्षात आल्यानंतर ठाकरे गटाने हालचाली सुरु केल्या होत्या. या खासदारांची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीवरुन प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, या बैठकीला फक्त पाच खासदारच पोहोचले होते. उर्वरित खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला हजर होते, असे सांगितले जाते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांविषयी सांगितले. त्यावेळी अनेक खासदारांनी आई तुळजाभवानी, साईबाबा आणि आपल्या मुलांची शपथ घेऊन आपण कुठेच जाणार नसल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता आईबाबा, साईबाबा या सगळ्यांच्या शपथा फेल ठरल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सोबत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या सर्व खासदारांना अपेक्षित गोष्टी देऊन आपल्या बाजूला वळवण्यात आणि त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे.

ठाकरे गटाने आपले खासदार फुटणार हे कळाल्यानंतर संबंधित मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते. जेणेकरुन खासदार गेले तरी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत राहतील, असा प्रयत्न होता. या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी खासदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नये, अशी भूमिका मांडली. मात्र, एकनाथ शिंदे यांना या सगळ्याची आधीपासूनच कल्पना होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंगळवारी रात्री दिल्लीला जाण्यासाठी निघाले, ते दिल्लीला न जाता राजस्थानला पोहोचले. याठिकाणी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे विमानाने पुन्हा दिल्लीत आले. अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची खात्री केली आहे.
Maharashtra Politics news: ठाकरे गटाचे कोणते खासदार दिल्लीत दाखल?
ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख आणि संजय जाधव, संजय दिना पाटील हे खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. ठाकरे गटातही जोरदार हालचाली सुरू असून अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे संकटमोचकांच्या भूमिकेत सक्रिय झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा शिवसेनेत मोठी फूट पाडून दाखवली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचे राज्यात आणि केंद्राच्या राजकारणातील वजन आणि दबदबा वाढणार आहे. भाजपप्रमाणे आपणही आपल्या नेतृत्त्वाच्या जोरावर विरोधी पक्षातील मोठा गट फोडू शकतो, असले राजकारण आपल्यालाही जमते, हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. मात्र, या सगळ्यामुळे ठाकरे गटाची अवस्था बिकट होणार आहे. ठाकरे गटाचे राज्यातील अस्तित्त्व कितपत उरणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Shivsena MPs: ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत आहे. हा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी सध्या शिंदेंच्या गोटात जोरदार तयारी सुरु आहे. याच वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील













