सांगोला-
नगरपरिषदेची थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येथील भाजी मंडई लगत असलेल्या गाळा क्रमांक ७ अ (आरक्षण क्रमांक २३) चे धारक सत्तार इ. आतार यांनी गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषदेचा ५४,५७१/- रुपयांचा कर थकीत ठेवला होता. वारंवार सूचना देऊनही थकबाकीचा भरणा न केल्याने, अखेर माननीय मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या आदेशानुसार हा गाळा प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.
प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन दगडू पाडे यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेच्या वसुली पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पथकाने गाळ्याला टाळे ठोकले असून, या कारवाईमुळे शहरातील थकबाकीदार गाळेधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
इतर गाळेधारकांना प्रशासनाचा इशारा:
नगरपरिषद प्रशासनाने या कारवाईद्वारे स्पष्ट संकेत दिले आहेत की, ज्या गाळेधारकांनी अद्याप आपला कर भरलेला नाही, त्यांनी कोणतीही कठोर प्रशासकीय किंवा जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तात्काळ नगरपरिषद कार्यालयात जाऊन आपली थकबाकी जमा करावी. आगामी काळात ही वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी कर भरून नगरपरिषदेच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Breaking news 🗞️ 🗞️








