Dnyaneshwar Maharaj: परंपरेनुसार बाजीराव विहीर येथे २३ जुलैला गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे थांबणार आहे. त्यानंतर २४ जुलैला आषाढी दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्व संतांच्या पालख्यांसह माउलींची पालखी पंढरपूर येथे राहणार आहे. आषाढी एकादशी सोहळा २५ जुलैला होणार आहे.

ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात आठ जुलै आळंदी येथून प्रस्थान, नऊ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी १६ जुलैला लोणंद येथे मुक्कामी असेल.

लोणंद येथून पुढे दुपारी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे. १७ जुलैला फलटण, १८ जुलै रोजी बरड येथे पालखी मुक्कामी असेल.
नातेपुते येथे पालखी १९ जुलैला मुक्कामी राहणार आहे. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. २१ जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी मुक्कामी असेल. ठाकुरबुवा समाधीजवळ २२ जुलैला तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भेंडीशेगावला मुक्कामी राहणार आहे.
मुक्कामाबाबत संभ्रम दूर
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे येथील मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. भाविकांची वाढती संख्या आणि अपुरी जागा यामुळे मुक्काम हलवण्याची चर्चा होती; परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर या वर्षीही पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने जाहीर केले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांना २५ मे २०२६ रोजी दिलेल्या लेखी पत्रात मुक्कामाच्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे. यामध्ये मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी शेजारील खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आवश्यक जागा ताब्यात घेणार
विद्युत खांब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहेत. पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर कारवाई सुरू असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रात म्हटले आहे.











