राज्यात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं प्रमाण सरासरी पेक्षा अधिक राहिलं, मुसळधार पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं, पावसामुळे ऐन हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम हिरावून घेतला गेला, त्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत, मात्र आता महाराष्ट्रातील पाऊस गेला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, आज या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, नागपूर वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर 25 ऑक्टोबर रोजी – सांगली, सोलापूर, धुळे, नंदूरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, धाराशीव, जालना बीड, नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातम्या





शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार?
शेतकऱ्यांना आधीच पावसाचा मोठा फटका बसला आहे, त्यातच आता अनेक ठिकाणी धानाची कापणी सुरू आहे, तसेच कापसाची वेचणी देखील सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास त्याचा मोठा फटका हा धान आणि कापसाला बसण्याची शक्यात आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.