Maharashtra Breaking News Today LIVE Updates 30 July 2025: लोकसभेतील ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील चर्चा आणि राज्यातील राजकीय घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर
बदलापुरात एमआयडीसी प्रशासनाचा भोंगळ कारभार
बदलापुरातल्या शिरगाव परिसरात कल्याण-कर्जत राज्य महामार्गाची दुरवस्था झालीय. खड्ड्यांमुळे या रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलय. दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनानं खड्ड्यांमध्ये दगड-विटा टाकून वाहन चालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय.
30 Jul 2025, 10:37 वाजता
संजय शिरसाट अजित पवार यांच्या भेटीला
संजय शिरसाट हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. निधीबाबतच्या मुद्यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील मल जलवाहिन्या आणि मैला टाक्या रोबोटद्वारे साफ करण्याबाबतच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. राज्यातील सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घरांबाबत धोरण निश्चित करण्याबाबतचा मुद्दा अधिवेशनात आला होता यावेळी बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. यानुसार बैठक आयोजित करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि या विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. राज्य सफाई कर्मचारी आयोग, सफाई कर्मचारी संघटना देखील या बैठकीत हजर राहणार आहेत.
30 Jul 2025, 10:33 वाजता
रबाळेत 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय
नवी मुंबईतील रबाळे तलावात एका 25 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. अग्निशमन दलाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक माहिती नुसार आत्महत्या करणारा मुलगा मागील काही वर्षापासून एका विवाहित महिलेच्या प्रेमात होता. याच प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. रबाळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारताना तरुण सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
30 Jul 2025, 10:13 वाजता
माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल- अंबादास दानवे
माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यांची चौकशी झालीय त्यात ते रमी खेळत होते स्पष्ट झाले आहे. तो रिपोर्ट बाहेर आला नाहीय. मात्र त्यांची संवेदन शिलता काय आहे असा प्रश्न पडतोय. त्यांना माफ करणे योग्य नाही अन्यथा सरकार शेतकरी विरोधी आहे. राजीनामा द्या घ्या काय करायचं ते करा. नाहीतर सभागृहात पट्ट्यांचा डाव सुरू करा. सरकार संस्कृतीच्या गप्पा मारते आणि मंत्र्यांचे काय सुरुय बघा. मुख्यमंत्री नुसती नाराजी व्यक्त करू नका, दमबाजी करू नका, कारवाई करा असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
30 Jul 2025, 09:38 वाजता
पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाख रुपयांची मागणी
एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फतच पोलीस अधिकाऱ्याकडे बदलीसाठी 35 लाखांची मागणी. पोलीस निरीक्षकाला इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी केली पैशांची मागणी. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी देखील मागितले पैसे. संशयित सागर पांगरे यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात.
30 Jul 2025, 09:01 वाजता
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात गुटखा बंदीसाठी अनोखे आंदोलन
गुटखा बंदीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने अनोखे आंदोलन सुरु केले आहे. गुटख्याच्या पुड्यांचे कपडे घालून या सामाजिक कार्यकर्त्याने पायी यात्रा काढली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते असा आकाश कोकने यांचा आरोप आहे. तेलंगना आणि कर्नाटक मार्गे देगलूर शहरातून नांदेड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी होते. गुटखा बंदीसाठी अनेकवेळा तक्रारी करुन कारवाई होत नसल्याने आकाश कोकणे यांनी गुटख्यांच्या पुड्याचा ड्रेस घालून निपाणी सावरगाव येथून पायी यात्रा काढली. गुटखा बंदीच्या मागणीसाठी त्यांनी देगलूर शहरात उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर त्यांनी आमरण उपोषण सरू केले आहे.
30 Jul 2025, 08:28 वाजता
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, बदलापूर- वांगणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी. बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला असून कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.
30 Jul 2025, 08:03 वाजता
ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज पंतप्रधान राज्यसभेत बोलणार
पाकिस्तानकडून भारतावर 1 हजार हजार मिसाईल आणि ड्रोननं हल्ला. भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमनं पाकचे सर्व मिसाईल हवेतच नष्ट केले. लोकसभेत मोदींची मोठी माहिती. ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज पंतप्रधान राज्यसभेत बोलणार.
30 Jul 2025, 07:41 वाजता
पुण्यातील सर्व धरणे 90 टक्के पेक्षा अधिक भरली
पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत ही धरणे ९०% पेक्षा अधिक भरली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मंगळवार पासून मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने पुणेकरांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. नदीपात्रातील ब्लू लाईन क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
30 Jul 2025, 07:13 वाजता
पुण्यात वाहन तोडफोडीचा सुळसुळाट
पुण्यात हडपसर, कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना वाढत असून, गेल्या दीड वर्षात 124 गुन्हे दाखल झाले आहेत. 2024 मध्ये 89 तर 2025 मध्ये जूनअखेर 35 घटना घडल्या.
30 Jul 2025, 06:39 वाजता
पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री
पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून भाविकांना विकलं जातंय. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय.