टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती

LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

LPG Gas Shortage: इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने (Central Government) खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या एलपीजी टँकरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारतातील एलपीजीचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने या परिस्थितीचा थेट परिणाम देशातील गॅस पुरवठ्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठी केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

LPG Gas Shortage: निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर होत आहे. नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. युद्धाच्या कठीण परिस्थितीत आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत, मात्र एलपीजीवरील निर्बंध सरसकट न लावता टप्प्याटप्प्याने लागू करावेत, अशी संघटनेची भूमिका आहे.

LPG Gas Shortage: हॉटेल इंडस्ट्री बंद करण्याची वेळ येणार?

नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वझलवार यांनी सांगितले की, कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद राहिला तर पुढील चार ते पाच दिवसांत देशातील हॉटेल इंडस्ट्री बंद करण्याची वेळ येऊ शकते. हजारो छोटे-मोठे हॉटेल व्यवसाय या गॅसवर अवलंबून असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते, अशीही त्यांनी भीती व्यक्त केली.

LPG Gas Shortage: पुण्यातही  व्यावसायिक LPG गॅस पुरवठा बंद

दरम्यान, पुण्यातही व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांटमध्ये आणि एचपीसीएलच्या चाकण येथील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. डीलर्सना पुढील आदेश मिळेपर्यंत कमर्शियल सिलेंडर घेण्यासाठी गाड्या पाठवू नयेत, अशा सूचना तेल कंपन्यांकडून देण्यात आल्या आहेत.

LPG Gas Shortage: राज्य सरकारने केंद्राशी बोलून मधला मार्ग काढावा

तेल कंपन्यांनी डीलर्सना पाठवलेल्या संदेशात स्पष्ट म्हटले आहे की, “युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा पुढील सूचनेपर्यंत थांबवण्यात येत आहे. कृपया सिलेंडर घेण्यासाठी गाड्या पाठवू नयेत. परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल.” सध्या भारताकडे सुमारे 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास देशातील गॅस पुरवठ्यावर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात घरगुती गॅस मिळण्यातही विलंब होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगासाठी काही मधला मार्ग काढावा, अशी मागणीही उद्योग संघटनांकडून करण्यात येत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now