अहमदाबाद, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 356 धावांचे आव्हान दिले होते. तर प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 34.2 षटकात 214 धावांवर गारद झाला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय संघाने शुभमन गिलचे शतक, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत सर्वबाद 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंड संघाला 34.2 षटकांत 10 गडी गमावून केवळ 214 धावांवर गारद झाला. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडच्या पराभवाचे मुख्य कारण त्याचे फलंदाज ठरले. फिल सॉल्ट, बेन डकेट, टॉम बँटन, जो रूट, हॅरी ब्रूक या तिघांनी चांगली सुरुवात केली पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. टॉप ऑर्डरच्या 5 फलंदाजांमध्ये बँटनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 38 धावांची शानदार खेळी केली. डकेटने 34, सॉल्टने 23, रूटने 24 धावा केल्या.
हॅरी ब्रूकला केवळ 19 धावा जोडता आल्या. कर्णधार बटलर केवळ 6 धावा करू शकला तर लिव्हिंगस्टनने 23 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चौथ्यांदा द्विपक्षीय मालिकेत निर्भेळ मालिका विजय नोंदवला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय संघ खूप काळानंतर एकदिवसीय सामने खेळण्यासाठी उतरला होता, पण भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी संघांची तयारी चांगली कशी आहे हे दाखवून दिले.