आशिया कप स्पर्धेच्या 17व्या पर्वाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. आशिया कप स्पर्धा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होईल. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत.
आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप 2025 स्पर्धेची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या दृष्टीने एक तात्पुरते वेळापत्रक तयार केलं आहे. या वेळापत्रकानुसार स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. 2025 च्या आशिया कपच्या आयोजनाचे हक्क भारतीय क्रिकेट बोर्डाकडे आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेवेळीच याबाबत निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित करावी लागणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड फॉरमॅटमध्ये आयोजित करण्याच्या मुद्द्यावर झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार येत्या काळात दोन्ही संघांचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागतील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं.
पाकिस्तानचे सर्व सामने हे यूएईत आयोजित करणं अपरिहार्य आहे. त्यामुळे बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयने ही स्पर्धा यूएईत आयोजित केली तर प्रवासाचं टेन्शनच राहाणार नाही. आशिया कप 2025 च्या पहिल्या फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना 7 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल असं सांगण्यात येत आहे. आशिया कप स्पर्धा टी20 स्वरूपात होणार आहे. आगामी टी20 विश्वचषक लक्षात घेऊन ही स्पर्धा टी20 स्वरूपात आयोजित केली जाईल. कारण 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. यापूर्वी वनडे वर्ल्डकप लक्षात घेत 2023 मध्ये वनडे फॉर्मेटमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि यूएई हे संघ असणार आहेत. मागच्या पर्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. भारताने 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या होत्या. त्यानंतर सुपर 4 फेरीत हे दोन्ही संघ भिडले. यात भारताने 356 धावांचं आव्हान दिलं होतं. तसेच पाकिस्तानला 228 धावांनी पराभवाची धूळ चारली होती.