Daund Kala Kendra Firing : पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये कला केंद्रात गोळीबार करणारा बाळासाहेब मांडेकर हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर- वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा साख्खा भाऊ आहे.
दौंड: दौंडमधील अंबिका कला केंद्रामधील गोळीबार प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांविरोधात यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास गोळीबार झाला होता. गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहे.
गोळीबार करणारा आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ
पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये कला केंद्रात गोळीबार करणारा बाळासाहेब मांडेकर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर-वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे. शंकर मांडेकर यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शकंर मांडेकर हे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा मतदारसंघाचे आमदार आहेत. शकंर मांडेकर हे सर्वात आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मुळशी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. मात्र पाच वर्षानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य बनले. शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील ते उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबतच राहिले. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि पहिल्याच निवडणूकीत ते आमदार बनले.
शंकर मांडेकर हे बांधकाम आणि जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय करतात. त्यांच्या सख्ख्या भावाने दौंडमधील कला केंद्रात गोळीबार केल्याने आता ते चर्चेत आले आहेत.

नेमकं काय प्रकरण?
वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. यात सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची चर्चाही होती. पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते. याबाबत विरोधकांनी देखील पोलिसांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली, टीका होऊ लागल्याने 36 तासांनंतर स्वतः पोलिसांनी पत्रकार परिषदेत गोळीबाराचा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी चार संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
सम्बंधित ख़बरें





न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, गणपत जगताप, बाळासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा समावेश आहे. अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी वाखारी हद्दीतील न्यू अंबिका कला केंद्रात आरोपींनी आपल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. ही घटना प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली होती; त्यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले होते. यावेळी पोलिसांनी या घटनेप्रकरणी तपास सुरू केला होता; मात्र पोलिसांना ठोस माहिती मिळाली नव्हती. यावेळी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांना पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर ही घटना निदर्शनात आली. या गोळीबाराच्या घटनेत मात्र कोणीही जखमी झाले नाही. सर्व आरोपी हे मुळशी तालुक्यातील असल्याची पोलिसांनी प्रथमदर्शनी माहिती दिली.