Agriculture Minister Dattatray Bharne : कृषी खात्याची जबाबदारी मिळताच दत्तात्रय भरणे यांनी पहिला फैसला जाहीर केला. त्यांनी बारामतीचे नाव घेत त्यांचा मनोदय बोलून दाखवला. काल माणिकराव कोकाटेंचा खाते बदल झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भरणे यांना कृषी खात्याची लॉटरी लागली.
किती माणिक मोती गमवावे असा सवाल सरकारसमोर आहे. रमी खेळणे अंगलट आले असले तरी माणिकराव कोकाटे यांच्यावरील संकट खातेबदलावर निभावले. अजितदादांचे विश्वासू दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची अपेक्षेप्रमाणे लॉटरी लागली. कृषी मंत्री खात्याची जबाबदारी मिळताच भरणे मामांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी बारामतीचे नाव घेत पहिला फैसला पण जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे इंदापूरकरांच्या उत्साहाला भरते आले आहे. काय आहे तो निर्णय?
भरणे यांनी मानले आभार
आज सकाळीच ही आनंदवार्ता मिळाल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. या सर्वांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे ते म्हणाले. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळतं, यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कर्जमाफीची लवकरच घोषणा?
कृषी खात्याचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खाते बदल करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. आता कर्जमाफीची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, अजून या खात्याचा आपण पदभार स्वीकारला नाही. कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोकाटे आणि मुंडेबाबत प्रतिक्रिया काय?
संबंधित बातम्या





मंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. माणिकराव कोकाटे हे आमचे ज्येष्ठ आहेत. वरिष्ठांनी त्यांना मंत्रिपद दिलं हे योग्यचं आहे, असे दत्तात्रय भरणे म्हणाले. तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद मागणी केली याची मला कल्पना नाही, असे सांगत त्यांनी याविषयी जास्त बोलणे टाळले.
बारामतीसारखं करणार इंदापूर
आज कृषीमंत्र्याची जबाबदारी मिळताच दत्तात्रय भरणे यांनी पहिला संकल्प सोडला. त्यांनी त्यांचे इंदापूरविषयीचे प्रेम व्यक्त केले. त्यांचा मनोदय व्यक्त केला. “मी शेतकरी कुटुंबातील असून मला बारामतीकरांनी (अजितदादांनी) भरभरून दिलं. पवार कुटुंबाचं माझ्यावर भरभरून प्रेम राहिलं आहे. विशेषतः अजितदादांनी भरभरून दिले. आता इंदापूर बारामतीसारखं कसं होईल यासाठी प्रयत्न करणार.” असा मनोदय दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. बारामतीसारखी इंदापूरची प्रगती साधण्याचा संकल्प त्यांनी सोडला.