Raj Thackeray and Uddhav Thackeray seat sharing: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षातील जागावाटप आज निश्चित होण्याची शक्यता. मुंबईत घडामोडींना वेग.
Raj Thackeray and Uddhav Thackeray seat sharing: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांकडून 24 डिसेंबरला म्हणजे बुधवारी ठाकरे गट-मनसे युतीची (Thackeray Camp MNS Alliance) अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज आणि उद्धव (Uddhav Thackeray) हे बुधवारी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात घोषणा करतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा (BMC Election 2026) जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 145 ते 150 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवेल. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला 65 ते 70 जागा येण्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी 10 ते 12 जागा सोडण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे ठाकरे गटाने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास 12 ते 15 जागा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसाठी सोडल्या आहेत. या जागांवरील बहुतांश माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाकडे तुल्यबल उमेदवार नाही. तुलनेत या जागांवर मनसेकडे ताकदवान उमेदवार उपलब्ध आहेत. परंतु, अद्याप भांडूप, कांदिवली, बोरिवली, मुलुंड परिसरातील काही वॉर्डांमधील तिढा अद्याप सुटलेला नाही. हा तिढा सुटून संपूर्ण जागावाटप निश्चित झाल्यानंतरच युतीची अधिकृत घोषणा व्हावी, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मुंबईतील अमराठी वॉर्डांमध्ये काय रणनीती असावी, याबाबतही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

संपूर्ण जागावाटप निश्चित होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करु नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही दिल्या आहेत. दोन्ही बाजूंनी जागावाटपाचा निर्णय अंतिम होऊ दे. आपल्याला ज्या जागा हव्या आहेत, त्या मिळत नाहीत तोपर्यंत युतीची घोषणा करु नये, अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे. काल मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यावेळी शिवडी आणि दादरमधील जागावाटपाचा तिढा पार पडला होता. परंतु, भांडूप, विक्रोळी आणि पश्चिम उपनगरातील काही जागांवरुन ठाकरे गट आणि मनसे यांच्यात अद्याप रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे जागावाटप लांबले आहे.
संबंधित बातम्या
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेतील इच्छूक उमेदवार पक्षाकडून देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मकडे डोळे लावून बसले आहेत. 31 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. जागावाटपाची चर्चा जितकी जास्त लांबेल, उमदेवार जाहीर करण्यास तितका उशीर होईल. यामुळे संबंधित उमेदवारांना प्रचार करण्यासाठी कमी वेळ मिळेल. याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळे आजच जागावाटप संपवून उद्या मनसे-ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्याचा दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.




