Vidhanparishad Election 2026 BJP Candidates: भाजपमधील पराभूत विधानपरिषदेसाठी देव पाण्यात बुडवून बसले, पण या एका अटीमुळे खेळ संपला, भाजपकडून कोणाकोणाला संधी मिळणार?

Vidhanparishad Election 2026 BJP Candidates: आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत 30 जणांची नावं निवडण्यात आली. माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे यांची नावे यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या (BJP) दिल्लीतील नेत्यांकडून विधानपरिषदेच्या (Vidhanparishad Election 2026) उमेदवारांची निवड करताना एक महत्त्वाची अट लागू केली जाऊ शकते. यामुळे अनेक संभाव्य उमेदवारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics news)

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषदेवर संधी द्यायची नाही, असे धोरण स्वीकारल्याची माहिती आहे. याउलट संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरणे साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे भाजपने निश्चित केल्याची माहिती आहे. भाजपच्या या निर्णयामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना मोठा धक्का बसणार आहे. जे लोक लोकांमधून निवडून येत नाहीत, त्यांचं मागच्या दाराने राजकीय पुनर्वसन करणं योग्य नाही, असे मत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने खासगीत व्यक्त केले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रस्थापित आणि बड्या नेत्यांच्या अपेक्षांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली होती. त्या जागी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.











