आम आमदी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Raghav Chadha Joins BJP: देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ते फक्त एकटेच भाजपात जात नाहीयेत. त्यांच्यासोबत राज्यसभेचे इतरही दोन खासदार भाजपात जाणार आहेत. थेट पत्रकार परिषद घेऊन राघव चड्ढा यांनी तशी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पक्षासोबत वाद चालू होते. पक्षाच्या धोरणाबाबत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्ढा यांच्यासोबतच आप पक्षाच्या राज्यसभेच्या इतर सहा खासदारांनीही भाजपात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पक्षासोबत सुरू होता वाद
राघव चड्ढा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यसभेत असताना त्यांनी भाजपाच्या धोरणांवर सडकून टीका केलेली आहे. राज्यसभेत त्यांनी केलेले काही भाषणं गाजलेले आहेत. राज्यसभेत त्यांनी गीग वर्कर्स, इंटरटनेट, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पक्षासोबत वाद सुरू होते. पक्षाच्या धोरणानुसार राघव चड्ढा काम करत नाहीयेत, असा आरोप आप पक्षाने केला होता. त्यानंतर आता राघव चड्ढा यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राघव चड्ढा यांच्यासोबतच एकूण सात खासदारांनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंह, स्वाती मालिवाल, राजेंद्र गुप्त, संदीप पाठक, विक्रमजित साहनी, अशोक मित्तल अशा इतर सहा खासदारांची नावे आहेत.
नेमकी काय घोषणा केली?
गेल्या एका वर्षांपासून मी पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर होतो. तुम्ही दूर का राहताय, असे मला विचारले जायचे. मी सर्वकाही सुरळीत होईल, यासाठी वाट पाहात होतो. परंतु आज मी तुम्हाला खरे कारण सांगतो. आम आदमी पार्टीच्या गुन्ह्यांमध्ये मला सामील व्हायचे नव्हते. आमच्याकडे फक्त दोन पर्याय होते. एक तर राजकारण सोडा किंवा आमच्या अनुभवाचा वापर करून काही सकारात्मक राजकारण करावे, हे दोन पर्याय होते. त्यामुळेच आम्ही आम आदमी पार्टीच्या राज्यसभेच्या दोन तृतीयांश खासदारांनी भाजपा पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेण्याचा घेतला आहे, असे राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले.











