Uttamrao Jankar : माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
सोलापूर (पंढरपूर) : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आज झालेल्या पंढरपूर दौऱ्यात शरद पवार गटाच्या अजून एका आमदाराने त्यांची भेट घेतल्याने नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेवराय यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान कार्यक्रम होता. या कार्यक्रमात माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील हे पहिल्यापासून सोबत होते. अभिजीत पाटील हे पंढरपूरचे असल्याने ते नेहमीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात दिसतात. शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे हे तर उघडपणे आपण शिवसैनिक असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्या सोबत नेहमीच असतात. मात्र, आज माळशिरस मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनीही एकनाथ शिंदे यांची येऊन भेट घेतल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाचे चार आमदार असून आता हे तिसरे आमदार एकनाथ शिंदे यांच्या प्रेमात पडल्याचे दिसू लागले आहे. आज उत्तमराव जानकर हे पहिल्यांदा शिंदे यांच्या पुरस्काराच्या कार्यक्रमात पोहोचले मात्र तेथे भेट व चर्चा न झाल्याने ते पुन्हा विठ्ठल मंदिरात आले. येथे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कारही केला मात्र इथेही चर्चेला वेळ नसल्याने त्याने थेट हेलिपॅड गाठले आणि येथे त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि राष्ट्रवादी पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे दोघेही उपस्थित होते.

उत्तमराव जानकर यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या केसमध्ये जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे त्यांची आमदारकी अडचणीत आल्याच्या चर्चा सुरू असताना आज जानकर यांनी एकनाथ शिंदे यांची नेमकी भेट का घेतली यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही सूचक मौन बाळगले आहे.
आमदार उत्तमराव जानकार हे चळवळीतील धडाकेबाज नेता अशी त्यांची ओळख आहे. मारकडवाडी येथे झालेल्या ईव्हीएम आंदोलन असू किंवा निवडणूक काळात अजित पवारांपासून बड्या नेत्यांवर जोरदार आरोप करणे असो उत्तमराव जानकर हे नेहमीच आपल्या बेधडक विधानाने राज्यात प्रसिद्ध झाले आहेत. आता आज त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.