अहिल्यानगर दि. 12 फेब्रुवारी (हिं.स.) : बारावीच्या बोर्ड परीक्षांना प्रारंभ झाले असून,यामध्ये पहिल्याच पेपरदरम्यान एक गंभीर घटना घडली आहे. श्री वृद्धेश्वर हायस्कूल, तिसगाव (तालुका पाथर्डी) येथे एक गुंडाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली आहे. या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून, जबाबदारीवर असलेल्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार उध्दव नाईक व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, अशोक दौंड, डी.सी. फकीर, सुभाष भागवत, भारत गाडेकर, आसिफ पठाण, महिंद्र राजगुरू, आत्माराम दहिफळे, बापूसाहेब कल्हापूरे, एस.आर. पालवे, व्ही.व्ही. इंगळे, सुभाष भागवत, अजय भंडारी, समाधान आराक, सुरेश मिसाळ, छबुराव फुंदे, सी.एम. कर्डिले, एन.एस. मुथा, मच्छिंद्र बाचकर, सुधाकर सातपुते, डॉ. अनिल पानखडे, अजय शिरसाठ,व्ही.पी.गांधी आदी उपस्थित होते.बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरला शिक्षकांना धमकावि ण्याचा प्रकार घडला असताना, शिक्षिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
पेपर संपल्यानंतर काही गुंडांनी पेपर जमा करणाऱ्या शिक्षकाची गाडी अडवून त्यांना गाडीच्या बाहेर ओढून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांची सरमिसळ पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्यामुळे ओळख नसलेल्या आणि दूरवर असलेल्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास, इयत्ता, दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.————————–