सांगोला बार असोसिएशनकडून पोलिसांविरोधात कारवाईची मागणी
सांगोला : सांगोला येथील बार असोसिएशनचे सदस्य अॅड. सागर बंडू मेटकरी यांना पोलीस निरीक्षक विनोद घुगे व इतर कर्मचार्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सांगोला बार असोसिएशनकडून गुरुवार, दि. 2 एप्रिल रोजी निवेदन देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अॅड. सागर मेटकरी (रा. चांडोलेवाडी, ता. सांगोला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता त्यांच्या नातेवाईक रावसाहेब मेटकरी यांनी त्यांना सांगोला पोलीस ठाण्यात बोलावले होते. ते पोलीस स्टेशनच्या आवारात उभे असताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे व अन्य 5 ते 6 कर्मचारी त्यांच्या जवळ आले. तू येथे कशाला आला आहेस? असे विचारले त्यावर मेटकरी यांनी आपण वकील असून नातेवाईकावरील गुन्ह्याबाबत चौकशीसाठी आल्याचे सांगितले. यावर पोलीस निरीक्षकांनी संतप्त होत ते कोर्टात बघायचे, येथे येऊ नकोस असे म्हणत त्यांना कानशिलात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर शिवीगाळ करत कॉलरला धरून त्यांना पोलीस स्टेशनमधील एका खोलीत नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला गेला आणि रात्री सुमारे 1.30 वाजेपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.अॅड.सागर मेटकरी यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची तक्रार करू नकोस, अन्यथा हया केसमध्ये गुंतवून जेलमध्ये सडविलेशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली तसेच त्यांनी माझेकडून कोर्या कागदावर सही घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या घटनेबाबत अॅड. मेटकरी यांनी दि. 1 एप्रिल रोजी सांगोला बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार 2 एप्रिल रोजी तातडीची बैठक बोलावण्यात आली. बैठकीत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित पोलीस निरीक्षक व कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बार असोसिएशनच्या निवेदनात संबंधितांवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा यांना देण्यात आल्या आहेत.







